खंडाळ्यात महामार्गावर टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; कामावर जाताना युवकावर काळाचा घाला

आशियाई महामार्गावरील पारगाव-खंडाळा या ठिकाणी हा अपघात घडला. यामध्ये एका टँकरने दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये एक जण ठार तर एक जण जखमी झाला आहे.

    खंडाळा : राज्यभरामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे. खंडाळा जवळ देखील दुचाकी स्वाराचा अपघात झाला. आशियाई महामार्गावरील पारगाव-खंडाळा या ठिकाणी हा अपघात घडला. यामध्ये एका टँकरने दुचाकीला दिलेल्या धडकेमध्ये एक जण ठार तर एक जण जखमी झाला आहे. घटनास्थळावरून चालकाने टँकर न थांबवता पलायन केले.

    याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार,  खंडाळा परिसरातील दोन युवक दुचाकीवरून (क्र. एम.एच.11 डी.6515) एमआयडीसीमध्ये कामासाठी निघाले असताना महामार्गावर खंडाळा- पारगाव येथील पिराचा पूल या ठिकाणी पाठीमागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या टँकरने दुचाकीला जोराची धडक दिली. यावेळी दुचाकीवरील चालक मयूर संतोष फडतरे (वय.२२ रा.बावडा ता. खंडाळा) हा किरकोळ जखमी झाला मात्र पाठीमागे बसलेला त्याचा सहकारी मित्र गोविंद गणपत चोरमले (वय.२३ रा.मरीआईचीवाडी ता.खंडाळा) याच्या अंगावरून टँकर गेल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

    या अपघातानंतर चालकाने टँकर न थांबवता पलायन केल्याने टँकरचा नंबर समजू शकला नाही. या घटनेची माहिती कळताच खंडाळा पोलीस ठाण्याचे पो.नि. सुनील शेळके व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील कारवाई करण्यात आली. या अपघाताबाबत मयूर फडतरे याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात टँकर चालकाविरुद्ध खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस अंमलदार अशोक जाधव हे करीत आहेत.