साताऱ्यात शरद पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि.१२) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. अनेक ठिकाणी व्हर्च्युअल रॅली, सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

    सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि.१२) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. अनेक ठिकाणी व्हर्च्युअल रॅली, सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात पदाधिकारी, मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. शरद पवार यांना दीर्घायुष्य लाभावे अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.

    शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातील प्रत्येक गावात परिवार संवाद हे अभिनव अभियान सुरु केले आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासात दिलेले योगदान, लोकहितासाठी घेतलेले महत्वपूर्ण निर्णय याची माहिती सर्वसामान्य जनता आणि तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर कराड उत्तर व दक्षिणची व्हर्च्युअल रॅली वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृह, कराड, वाई येथील लक्ष्मणराव पाटील हॉल बाजार समिती यशवंतनगर, कोरेगाव येथील दिलीप मल्टिपर्पज हॉल, फलटण येथे अनंत मंगल कार्यालय कोळकी, खटाव पंचायत समिती बचत सभागृह, माणची व्हर्च्युअल रॅली प्रभाकर देशमुख संपर्क कार्यालय दहिवडी, हिलरेंज हायस्कूल सभागृह भिलार, सातारा येथील राष्ट्रवादी भवन व गजानन मंगल कार्यालय फुटका तलाव सातारा, सुस्वाद हॉल पाटण या ठिकाणी व्हर्च्युअल रॅली काढण्यात आली.

    शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादी सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात केक कापून शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

    यावेळी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष समिंद्रा जाधव, अल्पंसख्याक जिल्हाध्यक्ष शफिक शेख, सेवादल प्रमुख संघटक राजेंद्र लावंघरे, शशिकांत वायकर, कुसुम भोसले, उध्दव बाबर, बाळासाहेब शिंदे, अनिल बडेकर,गणेश किर्दत, सुवर्णा पवार, प्रभावती बेंद्रे, प्रशांत घनवट, सुजाता बावडेकर, रुपाली भिसे, उषा शिंदे, सुनिता शिंदे, मेघा माने, ऍड. रणजितसिंह जगदाळे, संदीप धुमाळ, किरण गोगावले यांच्यासह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.