‘पीडितांच्या जखमेवर मुख्यमंत्री मीठ चोळताहेत’; चित्रा वाघ यांची टीका

महिला व मुलींवर राज्यात अत्याचार झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यावर बोलणे सोडून इतर राज्यात किती अत्याचाराच्या घटना घडल्या हे सांगतात. इतर राज्यातील घटनांशी तुलना करून मुख्यमंत्री पीडित महिला व मुलींच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत

    पुणे : महिला व मुलींवर राज्यात अत्याचार झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) त्यावर बोलणे सोडून इतर राज्यात किती अत्याचाराच्या घटना घडल्या हे सांगतात. इतर राज्यातील घटनांशी तुलना करून मुख्यमंत्री पीडित महिला व मुलींच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत, असा आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला.

    राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून फसवणुकीची दोन वर्ष या शिर्षकाखाली विविध नेत्यांच्या पत्रकार परिषदा आयोजित केल्या जात आहेत. या अनुषंगाने बुधवारी चित्रा वाघ यांची पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.

    राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंदवडे निघाले असून, पोलिस यंत्रणा शासनाच्या दावणीला बांधली आहे. बलात्कार्‍यांना वाचवण्याचे काम सरकार करत आहे, असाही आरोप वाघ यांनी केला.

    …तर सुनील कांबळेंवर कारवाई करावी

    महापालिकेच्या महिला अधिकार्‍यास शिवीगाळ करणार्‍या क्लिपमधील आवाज आमदार सुनील कांबळेंचा असेल तर त्यांच्यावर खुशाल कारवाई करावी, त्यांच्यावर कारवाई करू नये, अशी आमची भूमिका नाही, असेही वाघ म्हणाल्या. मागासवर्गीयांवरील अन्याय रोखण्यासाटी ज्याप्रकारे अ‍ॅट्रोसिटी कायदा आहे. त्याचधर्तीवर महिलांसाठी अ‍ॅट्रोसिटी कायदा करावा, त्यात अत्याचार करणार्‍यांना जामीन मिळू नये, अशी तरतूद करावी. तसेच अत्याचाराच्या खटल्यासाठी स्वतंत्र न्यायालय असावे, अशा मागण्याही वाघ यांनी यावेळी केली.