पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये भाजप नेत्याचा मृत्यू, बिहारमध्ये राजकारण तापले; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण

  Bihar Politics : बिहार विधानसभेत राडा झाल्यानंतर भाजप नेत्यांनी मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेत एका भाजप नेत्याचा मृत्यू झाला आहे. पाटणा येथील डाकबंगला चौकात पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.
  भाजपचे सरचिटणीस विजय कुमार सिंह यांचा मृत्यू
  जहानाबाद शहरात झालेल्या लाठीचार्जमध्ये भाजपचे सरचिटणीस विजय कुमार सिंह यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये विजय जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
  राज्य सरकारच्या अपयशाचा आणि क्रोधाचा परिणाम
  या घटनेनंतर राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी याप्रकरणी नितीश सरकारला घेरले आहे. नड्डा म्हणाले, पाटण्यात भाजप कार्यकर्त्यांवर झालेला लाठीचार्ज हा राज्य सरकारच्या अपयशाचा आणि क्रोधाचा परिणाम आहे. भ्रष्टाचाराचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी महाआघाडीचे सरकार लोकशाहीवर आघात करत आहे, ज्याच्यावर आरोपपत्र दाखल झाले आहे. त्याला वाचवण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्र्यांनाही नैतिकतेचा विसर पडला आहे.
  शिक्षक नियुक्तीच्या मुद्द्यावरून सरकार विरोधात मोर्चा
  आज (गुरुवार) बिहार विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. शिक्षकांच्या नियुक्तीचा मुद्दा उपस्थित झाल्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली. भाजप सदस्यांनी वेलमध्ये येऊन सरकारला घेराव घातला आणि निदर्शने केली. त्यानंतर भाजपच्या दोन आमदारांना विधानसभेतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर रॅली काढणाऱ्या आमदार आणि नेत्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.