भाजप नेते किरीट सोमय्या आज दिल्ली दौऱ्यावर, करणार महाविकास आघाडीच्या ‘या’ नेत्यांच्या घोटाळ्याची चौकशी

    मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच त्यांनी घोटाळ्याचे आरोप करत हसन मुश्रीफ, भावना गवळी, अजित पवार, आनंदराव अडसुळ आणि आता अर्जून खोतकरांवर निशाणा साधला आहे.

    दरम्यान आज किरीट सोमय्या हे दिल्ली दौैऱ्यावर जाणार आहेत. आजच्या दिल्ली दौैऱ्यादरम्यान किरीट सोमय्या हे हसन मुश्रीफ,भावना गवळी, अजित पवार, अर्जून खोतकर आणि आनंदराव अडसूळांच्या घोटाळ्याची चौकशी संबंधित विभागात करणार असल्याचं त्यांनी ट्विट करत स्पष्ट केलं आहे.

    तसेच आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आर्थिक गैरव्यवहार आणि घोटाळा केला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्यातच आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आज ते थेट दिल्लीला पोहोचले आहेत. नुकताच सोमय्यांनी शिवसेना नेते अर्जून खोतकर यांच्या जालना साखर कारखान्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता.

    जालना साखर कारखान्यात जरंडेश्वर सारखाच घोटाळा करण्यात आला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात विश्वास नांगरे पाटील त्यांच्या पत्नी रुपाली नांगरे पाटील आणि सासरे पद्माकर मुळे यांचं नावही किरीट सोमय्यांनी घेतल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.