‘महाविकास आघाडी सरकारचा पापाचा घडा भरला’; भाजपच्या भंडारींचे टीकास्त्र

भ्रष्टाचाराच्या, गैरवर्तनाच्या आरोप असलेल्या मंत्र्यांना पाठीशी घालणाऱ्या आणि शेतकरी, एसटी कर्मचारी, एमपीएससीचे विद्यार्थी, अशा अनेक समाजघटकांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या गेंड्याच्या कातडीच्या महाविकास आघाडी सरकारचा पापाचा घडा भरला आहेत.

    सातारा : भ्रष्टाचाराच्या, गैरवर्तनाच्या आरोप असलेल्या मंत्र्यांना पाठीशी घालणाऱ्या आणि शेतकरी, एसटी कर्मचारी, एमपीएससीचे विद्यार्थी, अशा अनेक समाजघटकांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या गेंड्याच्या कातडीच्या महाविकास आघाडी सरकारचा पापाचा घडा भरला आहेत. अशा कुचकामी, बिनकामाच्या सरकारचा जनता जनार्दनच योग्यवेळी निकाल लावेल, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी (Madhav Bhandari) यांनी पत्रकार परिषदेत केली.

    भंडारी म्हणाले की, भ्रष्ट मंत्र्यांचं ओझं वाहणारं अत्यंत अकार्यक्षम, बेपर्वा सरकार असे आघाडी सरकारचं वर्णन करावं लागेल. गृहमंत्रिपद भूषविणाऱ्या मंत्र्याला पोलीस अधिकाऱ्यानेच १०० कोटी वसुलीचा आरोप झाल्यानंतर राजीनामा देणे भाग पडले तर दुसऱ्या मंत्र्याला तरुणीच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप झाल्याने मंत्रिपद सोडणे भाग पडले. परिवहन मंत्र्यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी सुरु आहे.

    उपमुख्यमंत्र्यांशी संबंधित व्यक्तींची, संस्थांची आयकर विभागाकडून बेहिशोबी मालमत्तेबद्दल चौकशी सुरु आहे. समाजकल्याण मंत्र्यांवर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला. गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांना एका तरुणाच्या मारहाणप्रकरणी अटक करण्यात आली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी आपल्या उमेदवारी अर्जात मालमत्तेबाबत माहिती दडविली असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

    एका व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर विधिमंडळात पुराव्यानिशी आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वाझे यांचे समर्थन केले होते. या सर्व घटनांतून आघाडी सरकारला भ्रष्टाचाराची, गैरवर्तनाची चाड राहिली नसल्याचे दिसून येते आहे.