“भाजप पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत ताटकळत ठेवलं का ?’ चर्चांवर उदयनराजेंनी स्वतः दिलं स्पष्टीकरण

उदयनराजे यांना दिल्लीत तीन दिवस ताटकळत राहावं लागलं, अशी चर्चा सुरु होती. अखेर या चर्चांवर उदयनराजे भोसले यांनी अखेर प्रतिक्रिया दिली आहे.

    सातारा – भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. मात्र त्यासाठी उदयनराजे हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. सातारा लोकसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा होता. त्यामुळे उदयनराजे भोसले हे गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. उदयनराजे यांना दिल्लीत तीन दिवस ताटकळत राहावं लागलं, अशी चर्चा सुरु होती. अखेर या चर्चांवर उदयनराजे भोसले यांनी अखेर प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली दौऱ्यावरुन साताऱ्यामध्ये परत आल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे.

    दिल्ली दौऱ्यावरुन परतल्यानंतर उदयनराजे भोसले म्हणाले, “माझे याअगोदरही दिल्लीत दौरे चालूच होते. मधल्या काळात जरा दिल्लीला जावं लागलं. नेहमी बातम्या येत होत्या की, ताटकळत ठेवलं. पण असं काही नाही. आज केवळ आपल्या सातारा आणि महाराष्ट्राची निवडणूक नाही. संपूर्ण देशभरात निवडणूक सुरु आहे. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यातील प्रत्येक टप्पातील निवडणुकीच्या आधी वेगवेगळ्या पक्षांमध्ये तेढ निर्माण झाले होते. महायुतीत तेढ निर्माण झाला होता ते सोडवण्याचं काम आता झालेलं आहे” असे स्पष्टीकरण उदयनराजे भोसले यांनी दिले.

    पक्षश्रेष्ठींनी उदयनराजेंना काय शब्द दिला?

    माध्यमांनी उदयराजे भोसले यांना भाजप पक्षश्रेष्ठींनी तुम्हाला काय शब्द दिला? असा प्रश्न विचारला असता उदयनराजेंनी भूमिका मांडली. “पक्षश्रेष्ठींनी मला काय सांगायचं ते सांगितलं आहे. पक्षश्रेष्ठी म्हणजे माझे मित्रमंडळी आणि सहकारी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या इतर पक्षांच्या सहकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे. त्यामुळे त्याबाबत शंका घ्यायचं काही कारण नाही. एक लक्षात घ्या, कार्यकर्त्यांकडून आज जे जंगी स्वागत होतोय, हा इशारा कुणालाही नाहीय. उमेदवारांची यादी कदाचित आज जाहीर होईल. ती एक प्रक्रिया आहे. यादी जाहीर होईल. सगळं निश्चित झालेलं आहे. निवडणूक मी लढवणारच आहे. कधीतरी सातारला यायचंच होतं. आज मुहूर्त निघाला. आज आलो”, असे उदयनराजेंनी यावेळी स्पष्ट केले.