
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीतील विजयानंतर चंद्रशेखर बावनकुळे आणि वसंत खंडेलवाल यांना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले. सहापैकी एकूण चार जागांवर भाजपने विजय मिळवून पुन्हा एकदा आपली क्षमता व वर्चस्व सिद्ध केले आहे
अकोला, विधान परिषदेच्या सहा जागांपैकी चार जागा बिनविरोध झाल्यानंतर नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विकास आघाडीचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करीत विजयाचा झेंडा रोवला. नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला तर अकोल्यात शिवसेनेला जबर धक्का देत वसंत खंडेलवाल यांनी दणदणीत विजय मिळविला. बावनकुळे यांना 362 तर प्रतिस्पर्धी काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 तर काँग्रेसचे प्रथम उमेदवार रवींद्र भोयर यांना केवळ 1 मतावर समाधान मानावे लागले.
अकोल्यात 18 वर्षानंतर भाजपा
अकोल्यात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरशीची लढत झाली. यात भाजपाच्या वंसत खंडेलवाल यांनी बाजोरिया यांना पराभूत केले. खंडेलवाल यांना 438, तर शिवसेनेच्या बाजोरिया यांना 328 मते मिळाली. 31 मते अवैध ठरली. 18 वर्षानंतर भाजपाने शिवसेनेचा पराभव करत विजय मिळवला आहे.
भविष्यातील विजयाची नांदी
तीन पक्ष एकत्र आले म्हणजे सर्व प्रकारचा विजय होऊ शकतो, असे जे गणित मांडले जात होते ते चुकीचे आहे, तेही या विजयाने स्पष्ट केले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय हा भविष्यातील विजयाची नांदी आहे.
– देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
घोडेबाजार करून मिळविलेला विजय
घोडेबाजार करून हा विजय मिळविला आहे. घोडेबाजार होणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. स्वतःचे मतदार त्यांनी बाहेर नेले. त्यांचा आपल्या मतदारांवर विश्वास नव्हता. त्यामुळेच पर्यटनवारी करावी लागली.
– नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
गडकरींनी केले अभिनंदन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीतील विजयानंतर चंद्रशेखर बावनकुळे आणि वसंत खंडेलवाल यांना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले. सहापैकी एकूण चार जागांवर भाजपने विजय मिळवून पुन्हा एकदा आपली क्षमता व वर्चस्व सिद्ध केले आहे, असे गडकरी यावेळी म्हणाले.