हलगर्जी करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा : पृथ्वीराज चव्हाण

कराडच्या बुधवार पेठेतील विराट चव्हाण या लहान मुलाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाल्यामुळे त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी त्यांच्या घरी भेट दिली.

    कराड : कराडच्या बुधवार पेठेतील विराट चव्हाण या लहान मुलाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाल्यामुळे त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी त्यांच्या घरी भेट दिली. याप्रसंगी कराड शहर काँग्रेस अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, रमेश वायदंडे, ऋतुराज मोरे, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, सिद्धार्थ थोरवडे आदिसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

    विराट चव्हाण याचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण बाहेरगावी होते. काल शहरात येताच त्यांनी बुधवार पेठ येथील विराट चव्हाण याच्या घरी भेट देऊन त्याच्या कुटुंबियांची विचारपूस करीत सांत्वन केले. यावेळी पालिकेच्या हलगर्जीपणामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचे उपस्थित नागरिकांनी बाबांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच पालिकेच्या हलगर्जीपणामुळे गेल्या २ वर्षात अशा ११ घटना घडल्या असल्याच्या तक्रारी उपस्थित नागरिकांनी चव्हाण यांच्याकडे केल्या.

    पालिका सतर्क असण्याची गरज

    दरम्यान, या घटनेसंदर्भात चिंता व्यक्त करीत मुख्याधिकारी डाके यांना पृथ्वीराज चव्हाण यांनी फोन केला. जे ठेकेदार त्यांच्या कामात हलगर्जी करतात अशाना ब्लॅकलिस्ट करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. नागरिकांच्या तक्रारीबाबत पालिकेने सतर्क असण्याची गरज असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.