मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा अपघात; खुब्याला मार व हात फ्रॅक्चर

मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा अपघात झाला आहे. वळसे पाटील हे घरातच पाय घसरुन पडल्यानं त्यांना दुखापत झाली आहे.

    पुणे – मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा अपघात झाला आहे. वळसे पाटील हे घरातच पाय घसरुन पडल्यानं त्यांना दुखापत झाली आहे. त्यांच्या खुब्याला मार आणि हात फ्रॅक्चर झाला आहे. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येणार आहे. याच रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे. ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडवरच त्यांचा अपघात झाला आहे. ट्विट करुन त्यांनी ही माहिती दिली आहे.

    ट्वीटमध्ये दिलीप वळसे पाटील यांनी लिहिले आहे की, ‘काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईल, असे वळसे पाटील म्हणाले आहेत.

    लोकसभा निवडणूक जवळ आलेली असताना दिलीप वळसे पाटील यांचा अपघात झाला आहे. त्यांच्या या जखमेचा अजित पवार गटाला धक्का बसणार आहे. प्रचारक म्हणून वळसे पाटील यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. मात्र असा अपघात झाल्यामुळे त्यांना काही काळ आराम करावा लागणार आहे. अजित पवार गटाच्या प्रचारामध्ये दिलीप वळसे पाटील सहभागी होतील की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.