पुणे विभागात लाचखोर वाढले..!

२०२१ मध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने १६० सापळा कारवाया करत तब्बल २०० लाचखोरांना रंगेहात पकडण्यात यश मिळविले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांचा यात समावेश आहे.

    पुणे : एकीकडे सरकार लाचखोरी दूर करत पारदर्शक काम करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असताना वर्षागणिक “प्रशासनात” लाचखोरांची संख्या वाढतच चालल्याचे दिसत आहे. पुणे विभागात गेल्यावर्षीपेक्षा यंदा लाचखोरांची संख्या वाढली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा म्हणजे, २०२१ मध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने १६० सापळा कारवाया करत तब्बल २०० लाचखोरांना रंगेहात पकडण्यात यश मिळविले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

    पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) अधिपत्याखाली पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर असे पाच जिल्हे येतात. त्यापैकी पुणे जिल्ह्यात प्रत्येक वर्षी सर्वाधिक लाचखोरींच्या कारवाया केल्या जातात. पुणे जिल्ह्यात दोन महानगरपालिका व राज्य शासनाची अनेक महत्वाची कार्यालये आहेत. तसेच, पोलिसांचे विविध विभाग असल्याने पोलीस दल देखील मोठे आहे. प्रत्येक वर्षी एसीबीकडून जिल्ह्यात लाचखोरांवर कारवाई केल्यानंतर महसूल व पोलीस विभाग आघाडीवर असल्याचे दिसून येते. या दोन विभागात लाच मागताना अटक केलेल्यांचे प्रमाण सर्वाधिक असते.

    लाचखोरांची संख्या वर्षागणीक वाढत आहे. सरकार पारदर्शक प्रशासन देण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण, दुसरीकडे शासकीय नोकरदार टेबलाखालून नोट मिळाल्यानंतरच काम करत असल्याचे यावरून दिसत आहे. त्यातही या सापळा कारवाया आहेत. त्यामुळे एसीबीकडे न आलेल्या तक्रारी आणि पैसे देऊन कामे करणाऱ्यांची संख्या किती असेल याचा विचारच न केलेलाच बरा. त्यामुळे लाचखोरी थांबविण्यासाठी कठोर पावले तर उचलावी लागतीलच पण, लाच घेताना पकडल्यानंतर देखील तितकीच कडक कारवाई होणे गरजेचे आहे. अनेकांना लाच घेताना पकडल्यानंतर काही दिवसांत अंतर्गत चौकशी करून पुन्हा नोकरीवर रुजू करून घेतले जाते. तर, अनेक विभागात त्यांच्यावर निलंबनाची देखील कारवाई होत नाही.

    यंदा देखील सर्वाधिक कारवाया या महसूल विभागात झाल्या आहेत. त्याखालोखाल पोलीस विभाग असल्याचे दिसत आहे. तर, तिसऱ्या क्रमांकावर जिल्हा परिषद विभाग आहे. या तीन विभागात सर्वाधिक लाचखोरी असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच, निमशासकीय असणाऱ्या महावितरण विभागात देखील यंदा लाचेच्या कारवाया वाढल्या असून, त्याखाली महापालिका व पालिका असल्याचे दिसत आहे. दरम्यान, महसूल विभागात एसीबीने केलेल्या कारवायात एका क्लास वन अधिकाऱ्याला देखील यंदा पकडले आहे. तर, सर्वाधिक तृत्तीय क्षेणीतील कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले आहे. तर, पोलीस दलात देखील क्लास वनचा एक अधिकारी आणि दुत्तीय क्षेणीचे ५ आणि तृत्तीय क्षेणीच्या २१ जणांना पकडले आहे.
    क्लास वनच्या अधिकाऱ्यांना देखील लाच प्रकरणात पकडण्यात आलेले आहे. गेल्या वर्षी पुणे विभागात एकूण ८ क्लासवन अधिकाऱ्यांना पकडले होते. तर, यंदा ९ क्लास वन अधिकाऱ्यांना पकडण्यात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.