वांगी उत्पादक शेतकऱ्यांना ‘लक्ष्मीदर्शन’; किरकोळ विक्रीची २०० कडे धाव

भाजीपाल्यास ग्राहकांची असलेली मागणी आणि आवक कमी असल्यामुळे काही ठराविक भाजींच्या दरात मोठी वाढ झालेली दिसत आहे. विशेष करून वांगी उत्पादक शेतकऱ्यांना मालाला चांगला दर मिळत असल्याने 'लक्ष्मीदर्शन' होत आहे.

  सांगोला : गेल्या महिन्यातील अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला उत्पादनावर मोठा विपरीत परिणाम झाला होता. सहाजिकच त्यांनतर मोठ्या प्रमाणात भाजीपाला आवक कमी झाल्यामुळे दरवाढ झाली आहे. भाजीपाल्यास ग्राहकांची असलेली मागणी आणि आवक कमी असल्यामुळे काही ठराविक भाजींच्या दरात मोठी वाढ झालेली दिसत आहे. विशेष करून वांगी उत्पादक शेतकऱ्यांना मालाला चांगला दर मिळत असल्याने ‘लक्ष्मीदर्शन’ होत आहे.

  सांगोला शहरात दररोज सकाळी भाजीपाला लिलाव होतात. लिलावात आवक किती आहे, त्यानुसार दर ठरत आहे. चांगल्या प्रतीच्या ‘सांगोला वांग्याला’ लिलावात प्रति कॅरेट १५०० ते १७०० दर तर कधी -कधी आवक कमी असल्यास २००० रुपये इतका दर मिळत आहे. तसेच अंकुर वांग्यास ५०० ते ७०० रुपये मिळत आहे. व्यापारी व विक्रेते वांग्याची विक्री मंडई व आठवडा बाजारात सरासरी ४० ते ५० रुपये पाव किलो ते १५० ते २०० रुपये किलोप्रमाणे विकत आहेत. वांग्याचे दर ऐकून ग्राहक मात्र कसे हे दर म्हणतात, त्यावेळी व्यापारी वाढलेले खरेदी दर व अडत व्यापारी कमिशनमुळे दर वाढले असल्याचे सांगतात.

  वांगी या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर सर्व हंगामात खरीप, रब्‍बी आणि उन्‍हाळयातही करता येते. सर्वसाधारणपणे आहारात वांग्‍याचा भाजी, भरीत, वांग्‍याची भजी, इत्‍यादी अनेक प्रकारे उपयोग होतो. पांढरी वांगी मधुमेह असलेल्‍या रोग्‍यांना गुणकारी असतात. वांग्‍यामध्‍ये खनिजे ‘अ, ब ,क’ ही जीवनसत्‍वे तसेच लोह, प्रथीने यांचे प्रमाण पुरेसे असते. लग्न समारंभ कालावधीत वांग्याला मोठी मागणी असते. तसेच बाजारात प्रत्येक ग्राहकांच्या भाजीपाला खरेदीत वांगी प्राधान्यने असतात.

  सद्या वांग्याचे दर वाढलेले असले तरी मागणी मात्र फारशी कमी झालेली दिसत नाही. सर्वसामान्य लोकांपासून श्रीमंत लोकांपर्यंत वांग्याची मागणी असते, त्यामुळे सद्यातरी वांगी उत्पादक शेतकऱ्यांना दर वाढीमुळे अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळत आहे. याउलट शेतकरी वर्गाला मिळणाऱ्या पैशापेक्षा जास्त पैसे व्यापारीच मिळवत असल्याचे ग्राहकामधून बोलले जात आहे.

  सांगोला बाजारात ‘सांगोला वांगी’ या वाणास अधिक मागणी असून सद्या याचे दर शेतकऱ्यांना समाधानकारक आहेत तर इतर वांग्याच्या वाणास त्याच्या तुलनेत कमी दर मिळत आहे. . ज्या दिवशी मालाची आवक कमी असेल त्यावेळी अधिक चांगला दर मिळत आहे.

  – भारत माळी, अडत व्यापारी, सांगोला.

  भाजीपाला आवक कमी असल्याने दर वाढ झालेली असून खरेदी आणि विक्री करताना तारेवरची कसरत करावी लागते. कधी- कधी माल बदलत्या वातावरणामुळे खराब होतो तर कधी अनपेक्षित घट सोसावी लागत आहे. वांगी खरेदी किंमत आणि कमिशन तसेच हमाली इतर खर्च बगता दर वाढ झालेली दिसते.

   – रुकमाई माळी, भाजीपाला विक्रेते, सांगोला.