Brutal murder in Chhatrapati Sambhajinagar for helping sister's love marriage, killed by bolero four times on head

छत्रपती संभाजीनगरात एका तरुणाची पूर्ववैमनस्यातून निर्घृण खून करण्यात आला. खून एवढ्या निर्दयीपणे करण्यात आला की, तरुणाच्या डोक्यावर चार वेळा बोलेरो कार घालण्यात आली. विशेष गोष्ट म्हणजे मृत तरुणाचे सात दिवसांवर लग्न होते. या घटनेने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  छत्रपती संभाजीनगर : आपल्या बहिणीच्या प्रेमविवाहाला मदत केल्याचा राग मनात धरून संभाजीनगरमधील एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. एखाद्या चित्रपटाच्या कथानकालाही लाजवेल अशी घटना छत्रपती संभाजीनगरात (Chhatrapati Sambhaji Nagar) घडली. आरोपींनी मृत तरुणाच्या डोक्यावरून तब्बल चार वेळा बोलेरो कार घातल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संभाजीनगरात एकच खळबळ उडाली आहे.

  संभीजनगर हादरलं!
  मिळालेल्या माहितीनुसार संभाजीनगरातील शेंदूरवादा- सावखेडा महामार्गावर ही घटना घडली असून पवन शिवराम लोंढे (वय 24 वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने संभाजीनगरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मृत तरुणाचे पुढील आठवड्यात लग्न होते. घरात लग्नाची तयारी केली जात होती. ज्याच्या लग्नामुळे घरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते, त्याच्याच मृत्यूची बातमी आल्याने मृत तरुणाचे कुटंबीय टाहो फोडत आहेत.

  नेमकं काय घडलं?
  मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या आठवड्यात विवाह असल्याने मृत तरुण आपल्या वडिलांसोबत बँकेतून पैसे आणायला बाहेर गेला होता. यावेळी त्याच्या दुचाकीला बोलेरोच्या मदतीने जोरदार धडक देण्यात आली. विशेष म्हणजे तरुण खाली पडल्यानंतर त्याच्या अंगावर चार वेळा बोलेरो कार घालून त्याची हत्या करण्यात आली.

  आरोपीच्या बहिणीचा प्रेमविवाह व्हावा यासाठी केली मदत

  संभाजीनगरच्या वाळुज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेंदूरवादा- सावखेडा महामार्गावर ही घटना घडली होती. एखाद्या सिनेमाच्या कथानकलाही लाजवेल असा हा धक्कादायक प्रकार असल्याचे या परिसात म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीच्या बहिणीचा प्रेमविवाह व्हावा यासाठी मृत तरुणाने प्रयत्न केले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून ही हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. तसा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
  आरोपींच्या बहिणीने केला होता पळून जाऊन विवाह
  मृत पवन हा शेतकरी असून त्याच्या मामाचा मुलगा विशाल लक्ष्मण नवले याने संशयित आरोपी सचिन वाघचौरे, विशाल वाघचौरे यांच्या बहिणीशी पळून जाऊन विवाह केला होता. त्यांच्या विवाहाला पवन याने मदत केली होती. याचाच राग मनात धरून संशयित आरोपींनी बोलेरोने पवनच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये पवन गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर पवनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
  पोलिसांकडून तपास चालू
  दरम्यान, याप्रकरणी वाळुज पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.