नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, सातपूर भाजप मंडळ अध्यक्ष अमोल इघे यांचा खून

    नाशिक : सातपूर भाजपा मंडल अध्यक्ष व उत्साही,मनमिळावू कार्यकर्ते अमोल इघे यांची युनियनच्या वादातून आज सकाळी हत्या झाल्याची चर्चा अाहे. त्यांच्यावर धारदार शस्राने वार करण्यात आले.जखमी अवस्थेत त्यांना शासकीय हाॅस्पिटलमध्ये नेत असतांनाच त्यांचा मृत्यू झाला.

    शहर परिसरात हत्येचे सत्र सुरूच असून. गेल्या चार दिवसात ही तिसरी हत्या झाली आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीत म्हसोबा मंदिर येथे हा प्रकार घडला. दरम्यान युनियनच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

    महापालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. याची दखल घेत पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी शहरातील तीन पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांच्या कालच तडकाफडकी बदल्या केल्या. शहरात हत्या, लूटमार, चेनस्नॅचिंग यासह सर्व प्रकारचे गुन्हे वाढत आहेत. हे वृत्त समजताच पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून पोलिसांचा मोठा ताफा तैनात झाला आहे. सातपूर पोलिस तपास करीत आहेत.

    शहरात गुन्हेगारीच्या घटना काही कमी होताना नाही. राजकीय पूर्ववैमनस्यातून हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत अाहे. तसेच शहरातील पोलिसांच्या गस्ती बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    नुकताच पंचवटीत एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. किरकोळ वादातून ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. नाशिकमधील म्हसरूळ आरटीओ ऑफिसजवळ ही हत्या झाली होती. तर ऐन दिवाळीत एका महिलेची चाकूने वार करुन हत्या केल्याची घटना घडली हाेती.

    सातपूर परिसरात सकाळी झालेल्या खुनानंतर वातावरण चिघळले असून नाशिक भाजपा पदाधिकऱ्यासंह परिसरातील नागरिकांनी सातपूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

    सातपूर परिसरातील भाजपा मंडळ अध्यक्ष अमोल इघे यांची युनियनच्या वादातून हत्या करण्यात आली. मात्र यानंतर सातपूर परिसरात तणाव निर्माण होऊन पोलीस ठाण्यासमोर गर्दी झाली. यावेळी नाशिक शहरातील भाजप पदाधिकारी , परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले. त्याचबरोबर सातपूर पोलीस ठाण्याच्या समोर बसून आंदोलन सुरु केले. यावेळी नाशिक पोलिसांच्या कामगिरीवर भाजपा पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. यामध्ये भाजपा नेते लक्ष्मण सावजी यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर अशांत असून याला कारणीभूत नाशिक पोलीस आयुक्त तसेच पालकमंत्री जबाबदार आहेत.

    दिवसाढवळ्या, खून घरफोड्या चोऱ्या होत असल्याने नागरिक सुरक्षित आहेत का? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले आदींसह पदाधिकारी तसेच सातपूर परिसरातील नागरिक उपस्थित होते.