अबब ! तब्बल दीड टनाचा रेडा दिसला तासगाव शिवार कृषी प्रदर्शनात; शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची मोठी गर्दी

सांगलीच्या तासगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शिवार कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात खास आकर्षण ठरतोय तब्बल दीड टन वजन असणारा गजेंद्र नावाचा रेडा..! या दीड टनाच्या रेड्याला पाहण्यासाठी शेतकरी आणि ग्रामस्थांनी प्रदर्शनात भली मोठी गर्दी केली होती.

    तासगाव : सांगलीच्या तासगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शिवार कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात खास आकर्षण ठरतोय तब्बल दीड टन वजन असणारा गजेंद्र नावाचा रेडा (Big Buffalo)..! या दीड टनाच्या रेड्याला पाहण्यासाठी शेतकरी आणि ग्रामस्थांनी प्रदर्शनात भली मोठी गर्दी केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून शिवार कृषी प्रदर्शन भरवण्यात येत आहे. यंदाही कोरोनाचे नियम पाळून हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

    महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरील मंगसुळी गावातील विलास नाईक यांच्याकडील हा गजेंद्र रेडा आहे. या गजेंद्रचा रोजचा खुराक म्हणजे त्याला दिवसाला १५ लिटर दूध, बक्कळ ऊस, गवत आणि इतर खाद्य लागते. नाईक यांच्या घरच्या गिर म्हशींचा हा रेडा आहे. या रेड्याला पाहण्यासाठी हजारो किलोमीटरवरून लोक येत आहेत. तर, या गजेंद्रला तब्बल ८० लाखाला मागणी सुद्धा आली होती. पण, मालकांनी घरची पैदास असल्याने गजेंद्रला विकले नाही. आतापर्यंत गजेंद्रला कर्नाटकसह चार प्रदर्शनात मालकाने नेले होते आणि आज सांगलीच्या तासगाव येथे शिवार प्रदर्शनात तो आला आहे आणि खास आकर्षण बनला आहे.