ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या बसला आग; अनेक ईव्हीएम जळाल्या, अधिकाऱ्यांनी उडी मारून वाचवला जीव

मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात ईव्हीएम आणि निवडणूक अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला आग लागली. ही बस सहा मतदान केंद्रावरील मतदान साहित्य आणि कर्मचारी घेऊन बैतूल जिल्हा मुख्यालयाकडे जात असताना ही घटना घडली.

    बैतुल : मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात ईव्हीएम आणि निवडणूक अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला आग लागली. ही बस सहा मतदान केंद्रावरील मतदान साहित्य आणि कर्मचारी घेऊन बैतूल जिल्हा मुख्यालयाकडे जात असताना ही घटना घडली. यामध्ये काही ईव्हीएमचे नुकसान झाले असून, चालकासह अधिकाऱ्यांनी जळत्या बसमधून उडी मारून आपला जीव वाचवला.

    सायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिसनूर आणि पौनी गौला गावादरम्यान हा अपघात झाला. याबाबत माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बैतूल, मुलताई आणि आठनेर येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मतदान कर्मचारी आणि बस चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही, असे बैतुलचे जिल्हाधिकारी नरेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.

    या आगीत बुथ क्रमांक 275, 276, 277, 278, 279 आणि 280 या मतदान केंद्रांच्या ईव्हीएमचे नुकसान झाले आहे. बसमध्ये सहा ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट होते. त्यापैकी चार ईव्हीएम जळाले आहेत. तर दोन सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत आपला अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवतील आणि या बूथवर पुन्हा मतदान घेण्याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेईल.

    सुरक्षा दलाच्या जवानांनी बसची आग विझवली आणि आत ठेवलेले मतदान साहित्य बाहेर काढले. त्यानंतर मतदान कर्मचारी आणि ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन आणण्यासाठी दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली. या अपघातात सर्व मतदान कर्मचारी सुरक्षित आहेत.