स्पीड ब्रेकरवर पीएमपीएल बस आदळली; प्रवाशाचा मोडला मणका..!

    पुणे : भरधाव पीएमपीएल बस स्पीड ब्रेकवर जोरात आदळून झालेल्या घटनेत एका ज्येष्ठ नागरिक प्रवाशाचा मणकाच मोडल्याची घटना घडली आहे. या प्रवाशाच्या मणक्यात गॅप पडला आहे. याबाबत त्यांनी पोलीसांकडे तक्रार केली आहे.

    राजू मोतीराम चिंचवडकर (वय ६२, रा. आंबेगाव बुद्रुक) असे मणक्यात गॅप पडलेल्या प्रवाश्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चालक अस्लम कादर शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे (२७ नोव्हेंबर) लोहगाव ते कात्रज या बसमधून प्रवास करत होते. बस लोहगाववरून कात्रज येथील सर्पोद्यानासमोर आली. त्यावेळी चालक अस्लम याने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत बस अतिवेगात चालवून स्पीड ब्रेकवर ब्रेक न लावता घातल्याने बस आदळली. बस इतकी जोरात आदळली गेली की तक्रारदार यांच्या मणक्याला दुखापत झाली. त्यांच्या मणक्याला गॅप पडल्याचे समोर आले आहे. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलीसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, अस्लम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.