cds general bipin rawat

शासकीय इतमामात बिपीन रावत यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार(CDS General Bipin Rawat Funeral) करण्यात आले. सीडीएस बिपीन रावत यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित होते.

    दिल्ली : तामिळनाडूत भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर (Army Chopper Crash) कोसळून झालेल्या दुर्घटनेत संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत (Bipin Rawat Death)यांच्यासह इतर १३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. बिपीन रावत हे पत्नीसह वेलिंग्टन येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते. मात्र खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर तामिळनाडूतील कुन्नूरच्या जंगलात दुर्घटनाग्रस्त झाले. बिपीन रावत आणि इतर अधिकाऱ्यांचं पार्थिव गुरुवारी सांयकाळी दिल्लीला आणण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बड्या नेत्यांनी काल दुर्घटनेत शहीद झालेल्या अधिकाऱ्यांना आदरांजली वाहिली.

    आज दुपारी पाचच्या सुमारास बिपीन रावत(Bipin Rawat) आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत(Madhulika Rawat) यांच्या पार्थिवावर दिल्लीच्या ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. रावत यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत आल्यावर त्यांना १७ तोफांची सलामी देण्यात आली. त्यानंतर मंत्रोच्चारात शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार(CDS Generaj Bipin Rawat Funeral) करण्यात आले. त्यांची मोठी मुलगी कृतिका हिने आपल्या मात्यापित्यांना मुखाग्नी दिला. कृतिका यांनी रावत आणि मधुलिका रावत यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देताच अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

    सीडीएस बिपीन रावत यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित होते. संपूर्ण देशाने रावत यांना साश्रू नयनांनी निरोप दिला.जनरल बिपीन रावत यांचे पार्थिव राजधानी नवी दिल्लीत आल्यानंतर नागरिकांकडून रावत यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात आली. घोषणांनी राजधानीमधले रस्ते दुमदुमले आहेत. लोक हातात तिरंगा घेऊन ट्रकच्या मागे पळताना दिसत होते. यावेळी अमर रहे… अमर रहे… जनरल… जनरल अमर रहे, वंदे मातरम… भारत माता की जय… जब तक सूरज चांद रहेगा, बिपीनजी का नाम रहेगा… बिपीनजी अमर रहे…. अमर रहे, अमर रहे….च्या घोषणा दिल्या जात होत्या.

    सीडीएस बिपीन रावत यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो लोक जमले होते. दिल्ली आणि आजपासच्या राज्यातूनही लोक आले होते. तसेच श्रीलंका, भूतान, नेपाळ आणि बांगलादेशातील सैन्याचे कमांडरही या वीर योद्ध्याला अखेरची सलामी देण्यासाठी आले होते. स्वत: देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे रावत यांच्या अंत्ययात्रेत सामिल झाले होते.