वैद्यकीय अधिकाऱ्यांना सीईओ दिलीप स्वामींकडून नोटीसा

माझी वसुंधरा अभियान व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त गुरुवारी संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते.

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : अक्कलकोट तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना बेजबाबदारपणाच्या नोटीसा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जारी केल्या आहेत.

    माझी वसुंधरा अभियान व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त गुरुवारी संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमांची पाहणी करण्यासाठी सीईओ स्वामी हे अक्कलकोट दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावेळी तालुका आरोग्य अधिकारी अक्कलकोट डॉ. अश्विन करजखेडे अनुपस्थित होते. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राची तपासणी व इतर कामकाजाचा आढावा घेण्याच्या कामात अडचणी निर्माण झाल्याच्या कारणाने सीईओ स्वामी यांनी डॉ. अश्विन करजखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

    त्याचप्रमाणे सीईओ स्वामी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र चपळगाव येथे भेट दिली असता वैद्यकीय अधिकारी डॉ. काशिनाथ हारकुडे यांना वैद्यकीय चाचणी मशीन (क्लाऊड मशीन)चा वापर करता आला नाही. त्याचप्रमाणे औषधे उपलब्धता रजिस्टरबाबत समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एकंदरीत कामकाजात बेशिस्तपणा दिसून आल्याबद्दल आपणास निलंबित का करू नये म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सीईओ स्वामींनी केलेल्या या कारवाईमुळे आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.

    गेल्या काही दिवसांपासून बैठका व व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सीईओ स्वामी यांनी प्रशासकीय कामकाजात सुधारण्याविषयी अनेक वेळा सूचना व कारवाईचे इशारे दिले होते. तरीही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजात सुधारणा दिसून येत नाही, हे लक्षात आल्यानंतर आता सीईओ स्वामी यांनी कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे.