सोलापूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात कुलपती भगतसिंह कोश्यारी राहणार उपस्थित

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सतरावा दीक्षांत समारंभ ११ जानेवारी २०२२ रोजी होणार असून, या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) उपस्थित राहणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. 

    सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सतरावा दीक्षांत समारंभ ११ जानेवारी २०२२ रोजी होणार असून, या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) उपस्थित राहणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

    विद्यापीठाच्या दीक्षांत मैदानावर हा सोहळा संपन्न होणार आहे. या दीक्षांत सोहळ्यात 55 गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देण्यात येणार आहेत तसेच 130 विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी दिली जाणार आहे. त्याचबरोबर विविध पदव्या प्रदान करण्यात येणार आहे. हा सोहळा प्रत्यक्ष ऑफलाईन स्वरुपात आयोजित करण्याचे विद्यापीठाने योजिले आहे. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संमती दिली असून कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. व्ही. बी. पाटील, परीक्षा मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. एस. एस. गणपूर, प्रभारी कुलसचिव डॉ. एस. के. पवार तसेच विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषद सदस्य यांची मंचावर उपस्थिती राहील.

    या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठाने विविध 25 समित्यांचे गठन केले असून, या समित्यांनी आपल्या कार्याला प्रारंभ केलेला आहे. या दीक्षांत सोहळ्यात पदवी मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन यांच्यातर्फे वेळोवेळी कोविड प्रोटोकॉल संदर्भात ज्या सूचना  देण्यात येतील, त्या  सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करून हा दीक्षांत सोहळा होणार असल्याचेही विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.