निवडणूकीसाठी काय पण! चंद्रपूरच्या उमेदवारांनी दिली ‘आनंदाच्या शिधा’मध्ये व्हिस्की आणि बिअर देण्याचं आश्वासन

नंदाच्या शिध्यामध्ये व्हिस्की आणि बिअर देण्याचं आश्वासन अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत यांनी मतदारांना दिले आहे.

    चंद्रपूर : लोकसभा निवडणूक जवळ आल्याने उमेदवार मतदारांना वेगवेगळ्या पद्धतीने आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक आश्वासने आणि भेटवस्तू देत मतदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये तर अनोखे आश्वासन देण्यात आले आहे. आनंदाच्या शिध्यामध्ये व्हिस्की आणि बिअर देण्याचं आश्वासन अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत यांनी मतदारांना दिले आहे.

    आनंदाच्या शिध्यात देणार महागडी व्हिस्की अन् बिअर

    फक्त श्रीमंतांनीच महागडी व्हिस्की-बिअर का प्यावी? असं म्हणत देशी पिणाऱ्या गरिबांना देखील कधी कधी चांगली दारू मिळावी यासाठी आनंदाच्या शिध्यात व्हिस्की आणि बिअर देण्याचं अफलातून आश्वासन वनिता राऊत यांनी मतदारांना दिले आहे. श्रीमंतांप्रमाणेच गरिबांनी देखील महागडी व्हिस्की-बिअर मिळायला हवी. या हेतून त्यांना आनंदाच्या शिध्यात अतिशय अल्प दरात व्हिस्की-बिअर देण्याचे आश्वासन वनिता राऊतांनी मतदारांना दिलंय. त्यामुळे त्यांच्या या आश्वासनाचा परिणाम चंद्रपुर मतदारसंघातील मतदारांवर कितपत होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

    ‘गाव तिथे दारूचं दुकान’

    यापूर्वी देखील वनिता राऊत यांनी मतदारांना दारूबाबत आश्वासनं दिली आहेत. 2019 मध्ये चिमूर विधानसभेची निवडणूक लढवली होती. अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत त्यावेळी ‘गाव तिथे दारूचं दुकान’ असे भन्नाट आश्वासन दिले होते. चंद्रपुर लगतच्या इतर जिल्ह्यात, नागपूर मध्ये दारू बंदी नाही. मग चंद्रपुरकरांनी नेमके काय वाईट केले आहे की ज्यांना दारूबंदी सारखे निर्बंध घालण्यात येत आहे. चंद्रपुरमध्ये जर दारूबंदी उठवल्या गेली तर अनेकांना रोजगार मिळेल. असा अजब दावा त्यांनी त्यावेळी केला होता. मात्र चंद्रपूरकरांनी त्यांच्या या आश्वासनाला फार दाद दिली नाही. परिणामी त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आता वनिता राऊतांच्या या आश्वासनाला मतदार किती मतांच्या संख्येने साथ देतात याकडे लक्ष लागले आहे.