चंगीरामची चड्डी-बनियन टोळी गजाआड; मोक्का कायद्याअंतर्गत होणार कारवाई

उपराजधानीत एकापाठोपाठ तीन दरोडे टाकून खळबळ उडविणाऱ्या दरोडेखोर चंगीरामची चड्डी-बनियन टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली. पोलिसांनी सात दरोडेखोरांना अटक केली असून, यात दोन सराफांचाही समावेश आहे.

  नागपूर (Nagpur) : उपराजधानीत एकापाठोपाठ तीन दरोडे टाकून खळबळ उडविणाऱ्या दरोडेखोर चंगीरामची चड्डी-बनियन टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली. पोलिसांनी सात दरोडेखोरांना अटक केली असून, यात दोन सराफांचाही समावेश आहे.

  चंगीरामचा मुलगा गुरू ऊर्फ आकाश ऊर्फ गुज्जर मोग्या चंगीराम गोसाई (वय २१, रा. गुलगाव, जि. रायसेन, मध्य प्रदेश), निर्मल रोशनलाल मोग्या (वय २०, रा. माणिकपूर, चित्रकुट, उत्तर प्रदेश), रोहित ऊर्फ भगत रामदास भगत (वय २४), पिंट्या बब्बू मोग्या (वय १९, रा. धामरगुडा, विदिशा, मध्य प्रदेश) सराफा संदेश रोकडे, प्रवीण कन्होले आणि जीपचालक हरी श्रीराम आसोले (रा. म्हाडा र्क्वाटर, नारी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. टोळीचा सूत्रधार चंगीराम, त्याचा मुलगा व अन्य एक फरार आहे.

  २ डिसेंबरला दाभ्यातील ठाकरे लेआउट येथील वायुसेनेत कार्यरत सागर विष्णू खर्चे (वय ३०) यांच्याकडे दरोडा पडला. त्यानंतर ५ डिसेंबरला दाभ्यातीलच अनिता मेश्राम यांच्याकडे धाडसी दरोड्याची घटना घडली. या घटनांमुळे पोलिसांमध्ये खळबळ उडाली असतानाच १४ डिसेंबरला शिवणगाव पुनर्वसन येथील मंगेश देवराव वांद्रे यांच्याकडे दरोडा टाकण्यात आला. नागपूकरांमध्ये दहशत निर्माण झाली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दरोडेखोरांचा छडा लावण्याचे निर्देश गुन्हेशाखा पोलिसांना दिले.

  गुन्हेशाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनचे पोलिस निरीक्षक किशोर पर्वते, साहाय्यक निरीक्षक मयूर चौरसिया, गणेश पवार, उपनिरीक्षक बलराम झाडोकार, लक्ष्मीछाया तांबुस्कर, हेडकॉन्स्टेबल संतोष मदनकर, रेनॉल्ड अॅन्थोनी, राजेश तिवारी, शिपाई आशिष ठाकरे, प्रवीण रोडे, प्रशांत कोडापे, नरेंद्र ठाकूर, रवी अहिर, रवी शाहू, सुहास शिंगणे, महेंद्र शेडमाके, किशोर ठाकरे, सागर ठाकरे, कुणाल मसराम, सुधीर पवार यांनी दरोडेखोरांचा शोध सुरू केला व तिघांना मध्य प्रदेशात तर अन्य दरोडेखोरांना नागपुरात अटक केली. गुलगाव येथे पोलिसांच्या पथकावर दगडफेक झाल्याचीही माहिती आहे.

  संविधान चौकात जमा व्हायचे
  गुन्हेशाखा पोलिसांनी संपूर्ण सीसीटीव्हीची तपासणी केली. दरोडा टाकल्यानंतर दरोडेखोर जीपने संविधान चौकात यायचे. तेथे दागिने व पैशांची वाटणी करून तीन दरोडेखोर रामझुला परिसरात जात होते. सीसीटीव्ही तपासणीदरम्यान चंगीरामही पोलिसांना दिसला. पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी रामझुला परिसरातील एका घरात छापा टाकला. चंगीराम तेथे आढळला नाही. या दरोड्यात त्याच्या मुलांचाही सहभाग असल्याचे समोर आले. चंगीरामची मुले मध्य प्रदेशात असल्याचे कळताच पोलिसांचे पथक तेथे गेले. तेथून तिघांना अटक केली. त्यानंतर सराफा व चालकालाही गजाआड करण्यात आले. चंगीराम हा कुख्यात दरोडेखोर असून त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही त्याला पोलिसांनी अटक केली होती. घटनास्थळावर त्याच्या हाताचे ठसे आढळून आले, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

  मोक्का लावणार
  चंगीराम टोळीविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. या टोळीने नागपुरातील तीन ठिकाणी तर उमरेड व कुही येथेही दरोडा टाकल्याची माहिती समोर आली आहे. या टोळीतील आणखी तीन ते चार जण फरार असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे, असेही अमितेशकुमार यांनी सांगितले.