ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले…

    मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण देता येणार नसल्याचं सांगितलं आहे. यावरून आता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणुका डोक्यावर आल्या असताना 54 टक्के लोकसंख्या असलेल्या समाजावर अन्याय कसा करता येईल असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला आहे.

    छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले? 

    सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या निकालामुळे आम्ही चिंतेत आहोत. सर्वोच्च न्यायलयाने ट्रिपल टेस्ट सांगितली होती. त्यातील आम्ही दोन पूर्ण केल्या आहेत. इंपेरीकल डाटा गोळा करताना वेळ लागणार. कोरोनाच्या नवीन अडचणी समोर येत आहेत, असं सांगून पुढे त्यांनी ओबींसीवर अन्याय होत असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, आमचं बरोबर आहे की चुक हे महत्त्वाचं नाही. पण ओबींसीवर अन्याय होतोय हे लक्षात घ्यायला हवं. शासनाने घेतलेल्या निर्णयावर योग्य न्याय मिळावा म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही लक्ष घालण्याची गरज आहे. एवढ्या लोकांवर अन्याय होत आहे. याची नोंद घ्यायला हवी, असं देखील छगन भुजबळ यावेळी म्हणाले आहेत.

    दरम्यान, यावेळी भुजबळांनी या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, आम्ही कोर्टात आमची बाजू मांडणार आहोत. मात्र भाजपकडून कोर्टात सातत्याने विरोध केला जात आहे. ते कुणाच्या सांगण्यावरून काम करत आहेत. यांना आवरा असं आम्ही फडणवीसांना सांगितलं आहे, असंही ते यावेळी म्हणाले.