छत्रपती शिवाजी महाराज देखील ओबीसी होते; महादेव जानकरांचं गंगाखेडमध्ये वक्तव्य

सध्या राज्यात आरक्षणावरून राजकीय वाद सुरु असतानाच रासपचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य करत खळबळ माजवली आहे.

    परभणी : सध्या राज्यात आरक्षणावरून राजकीय वाद सुरु असतानाच रासपचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य करत खळबळ माजवली आहे.

    जानकर नेमकं काय म्हणाले? 

    ‘मराठा समाजाला माझी विनंती आहे. शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा आरक्षण दिलं. मराठ्यांना आरक्षण होतं. पण नंतर मराठ्यांचं आरक्षण का गेलं? छत्रपती राजे शिवाजी महाराज देखील ओबीसी होते. पण आमच्या तथाकथीत लोकांना वाटलं आमचं गावचं लई मोठं आहे. आम्हाला नको तसलं आरक्षण आणि आज काय अवस्था झाली आहे. असे वादग्रस्त वक्तव्य महादेव जानकर यांनी केलं आहे.

    माझे ३० ते ३५ आमदार निवडून द्या, अवघ्या १० मिनिटांत ओबीसींची गंमत करून दाखवतो. मराठ्यांना आणि मुस्लिमांनाही आरक्षण देतो, असेही महादेव जानकर म्हणाले आहेत. ते परभणी येथील गंगाखेड या ठिकाणी ओबीसी एल्गार आंदोलनात बोलत होते.

    तसेच पुढे बोलताना म्हणाले की, या देशात मुस्लिमांवर तर किती अन्याय आहे. गॅरेज बघितले की मुस्लिम, अंड्याचे दुकान बघितले की मुस्लिम, कोंबडीचं दुकान बघितलं की मुस्लिम, कुठं कलेक्टर नाही. बोंबाबोंब आहे. राज्य चालवणारा तिसराच मालक असतो. म्हणून आपण ही गोष्ट लक्षातच ठेवली पाहिजे, असंही जानकर म्हणाले आहेत.