छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष मारुतराव चोपडे यांचे निधन

भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष मारुतराव चोपडे (Marutrao Chopde) (वय ८७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सहकार क्षेत्रात सुमारे चार दशके आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा त्यांनी उमटविला होता.

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे (Chhatrapati Sugar Factory) माजी अध्यक्ष मारुतराव चोपडे (Marutrao Chopde) (वय ८७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सहकार क्षेत्रात सुमारे चार दशके आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा त्यांनी उमटविला होता. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे १९७४ ते १९७८ दरम्यान अध्यक्ष होते. सुमारे चाळीस वर्षे या कारखान्याचे ते संचालक होते.

    पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले होते. बारामती येथील नीरा कॅनॉल खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष व संचालक म्हणून त्यांनी काम केले होते. १९८० मध्ये भारतीय इंदिरा काँग्रेसच्या वतीने बारामती विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक त्यांनी लढविली होती. चोपडे यांच्या प्रचारासाठी तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी सभा घेतली होती. त्यानंतर त्यांनी पवार कुटुंबियांशी जवळीक साधली.

    भरदार शरीरयष्टी, पिळदार मिशा आणि बोलण्यातील करारीपणा हे मारुतराव चोपडे यांचे वैशिष्ट्य होते. आठ दिवसांपूर्वी चोपडे यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच बुधवारी (दि. १) रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी (दि. २) सकाळी साडेअकरा वाजता काटेवाडी (ता. बारामती) येथे त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.