कवी प्रशांत चव्हाण यांच्या ‘परिसर कविता’ संग्रहाला इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानचा बाल साहित्य पुरस्कार

इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, कमल वसंत कांबळे यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या वसंत - कमल स्मृती आत्मचरित्र पुरस्कारासाठी जळगाव येथील सुप्रसिद्ध चित्रकार राजू बाविस्कर यांच्या 'कळ्या निळ्या रेषा' या आत्मचरित्राची निवड करण्यात आली आहे.

    पुणे : इचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, कमल वसंत कांबळे यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या वसंत – कमल स्मृती आत्मचरित्र पुरस्कारासाठी जळगाव येथील सुप्रसिद्ध चित्रकार राजू बाविस्कर यांच्या ‘कळ्या निळ्या रेषा’ या आत्मचरित्राची निवड करण्यात आली आहे. तर लक्ष्मण कांबळे (जिंदा) स्मृती बालसाहित्य पुरस्कारसाठी पुणे येथील कवी प्रशांत चव्हाण यांच्या ‘परिसर कविता ‘ या बाल काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे.

    पाच हजार रुपये, स्मृती चिन्ह आणि ग्रंथ असे स्वरूप असलेल्या या पुरस्काराचे परीक्षक म्हणून नामवंत समीक्षक प्रा.डॉ.रणधीर शिंदे आणि नामवंत कवी अजय कांडर यांनी काम पाहिले, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष महावीर कांबळे यांनी दिली.

    यावर्षीच्या आत्मचरित्र पुरस्कारासाठी 19 आत्मचरित्रे तर बाल साहित्य पुरस्कारासाठी 37 पुस्तके प्राप्त झाली होती. गाव कुसाबाहेरच्या जगण्याच्या वेदनेला आपल्या चित्रकलेतून बाविस्कर यांनी वाट मोकळी करून दिली. तोच दुःखाचा धागा ‘कळ्या निळ्या रेषा’ या आत्मचरित्रात सापडत असूनही हे लेखन आवाजी नाही. त्यातील कमालीचा संयमपणा बाविस्कर यांची एक प्रगल्भ माणूस म्हणून जाणीव करून देतो.

    तर परिसरमधील बाल कविता या बालकांमध्ये परिसरची जाणीव करून देतानाच मुलांच्या संवेदनशीलतेलाच आवाहन करतात. यामुळे या दोन्ही ग्रंथांची निवड सदर पुरस्कारांसाठी करण्यात आली असल्याचे परीक्षकांनी म्हटले आहे.