या मंदिरात दाखवला जातो चॉकलेटचा नैवेद्य; आपल्या वजनाइतके अर्पण करतात चॉकलेट

भारतात असेही एक मंदिर आहे, जिथे चक्क चॉकलेटचा नैवेद्य देवाला दाखवण्यात येतो. केरळ येथील अलाप्पुझामध्ये केममोथ सुब्रमण्य मंदिरात देवाला चॉकलेटचा नैवेद्य दाखवला जातो.

    तिरुवनंतपूरम,  आपल्याकडे देवाला निरनिराळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. यात वेगवेगळे खाद्यपदार्थ, फळे, मेवामिठाई इत्यादींचा समावेश होतो. मात्र, भारतात असेही एक मंदिर आहे, जिथे चक्क चॉकलेटचा नैवेद्य देवाला दाखवण्यात येतो. केरळ येथील अलाप्पुझामध्ये केममोथ सुब्रमण्य मंदिरात देवाला चॉकलेटचा नैवेद्य दाखवला जातो. 300 वर्षं जुन्या मंदिरात ही प्रथा जवळपास दशकभरापूर्वी सुरू झाली. पूर्वी लोक नेहमीप्रमाणे नैवेद्य अर्पण करत असत, पण दहा वर्षांपूर्वी एक विलक्षण घटना या मंदिरात घडली. एक दिवस एक मुलगा मंदिरात आला.

    त्याने देवाला हातातल्या चॉकलेटचा नैवेद्य दाखवला आणि तो तिथून गायब झाला. तो तिथून कुठे गेला हे कुणालाच ठाऊक नाही. पण, त्याने चॉकलेट अर्पण केल्याची बातमी मात्र भाविकांमध्ये पसरली. तेव्हापासून लोक इतर पदार्थांचा नैवेद्य दाखवणे बंद झाले.

    आपल्या वजनाइतके अर्पण करतात चॉकलेट
    आता इथे चॉकलेटच अर्पण केले जाते. किंबहुना मंदिरात प्रार्थना केल्यानंतर देवाला चॉकलेट अर्पण करणे इथली प्रमुख प्रथा बनली आहे. काही लोक आपल्या वजना इतके चॉकलेट देवाला अर्पण करतात. इथे मुरुगन या देवाची पूजा केली जाते. मुरुगनला चॉकलेटचा नैवेद्य अर्पण केल्याने आपला नवस पूर्ण होईल, अशी श्रद्धा इथल्या भाविकांच्या मनात आहे. त्यामुळे आता या मुरुगन देवाला मंच मुरुगन म्हणून ओळखलं जातं.