सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचा घटनाक्रम, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे संसदेत सविस्तर निवेदन

सीडेस जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेची सविस्तर माहिती संसदेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. चार मिनिटांच्या निवेदनात नेमकी ही दुर्घटना कशी घडली, याचा सविस्तर घटनाक्रम सर्वांसमोर मांडला.

    नवी दिल्ली : सीडेस जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेची सविस्तर माहिती संसदेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. चार मिनिटांच्या निवेदनात नेमकी ही दुर्घटना कशी घडली, याचा सविस्तर घटनाक्रम सर्वांसमोर मांडला. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका आणि अन्य ११ अधिकाऱ्यांना श्रद्धांजली ही अर्पण केली.

    राजनाथ सिंह यांचे निवेदन 

    जनरल रावत हे वेलिंग्टनच्या डिफेन्स सर्व्हिस कॉलेजच्या पूर्वनियोजित दौऱ्यासाठी निघाले होते. बुधवारी सकाळी ११.४८ मिनिटांनी त्यांच्या हेलिकॉप्टरने टेक ऑफ केले. त्यांना १२.१५ मिनिटांनी लँडिंग करायचे होते. मात्र १२.०८ मिनिटांनी त्यांच्या हेलिकॉप्टरचा एअर ट्राफिक कंट्रोलसोबत असलेला संपर्क तुटला.

    स्थानिक नागरिक जेव्हा घटनास्थळी पोहचले, तेव्हा त्यांना मिलिटरीचे हेलिकॉप्टर जळताना दिसले. बचाव पथके जेव्हा घटनास्थळी पोहोटली तेव्हा हेलिकॉप्टरमधील सर्वांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु झाले. सैन्य अधिकाऱ्यांना वेलिंग्टनच्या लष्करी रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयातच सीडेस रावत, त्यांची पत्नी आणि अन्य अधिकाऱ्यांच्या मृत्यूची अधिकृत माहिती देण्यात आली.

    मृतांमध्ये ब्रिगेडियर एल एस लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह, विंग कमांडर पी एस चौहान, स्क्वॉर्डन लीडर के सिंह, नायक गुरसेवक सिंह, नायक जितेंद्र कुमार, लान्स् नायक विवेक कुमार, लान्स नायक बी साई तेजा, ज्युनिअर वॉरंट ऑफिसर दास, ज्युनिअर वॉरंट ऑफिसर ए प्रदीप आणि हवलदार सतपाल यांचा समावेश आहे.

    या अपघातातून वाचलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे गंभीर स्वरुपात जखमी असून, त्यांना वेलिंग्टनच्या रुग्णालयात लाईफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आले आहे. त्यांचे प्राण वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. सीडेस रावत, त्यांची पत्नी यांचे पार्थिव आज नवी दिल्लीत आणण्यात येणार आहे. सर्व सैन्य अधिकाऱ्यांवर सैन्य सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात येतील. एयर चीफ मार्शल वी आर चौधरी कालच घटनास्थळी पोहोचले आहेत. एयर मार्शल रामेंद्र सिंह यांच्या नेतृत्वात या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.