प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबितप्रश्नी उद्या सिडकोला घेराव

    पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai Airport) स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील (D.B.Patil) यांचे नाव द्यावे आणि प्रकल्पग्रस्तांचे (Project Victims) विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत यासाठी दिबांच्या स्मृतिदिनी अर्थात २४ जून रोजी सिडकोला (Cidco) घेराव आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने (Loknete D. B. Patil Navi Mumbai International Airport Naming All Party Action Committee) देण्यात आली.

    मागील आंदोलनाची पार्श्वभूमी सांगतानाच दिबांचेच नाव विमानतळाला लागेपर्यंत व भूमिपुत्रांच्या विविध मागण्या पूर्ण होईपर्यँत हा लढा कायम राहणार असल्याचे अधोरेखित करण्यात आले. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आदि जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्त भूमिपूत्रांनी मागील वर्षी १० जूनला भव्य साखळी आंदोलन, २४ जूनला ऐतिहासिक सिडको घेराव आंदोलन, ९ ऑगस्ट क्रांतिदिनी मशाल मोर्चा, १७ मार्चला भूमिपूत्र परिषद, सिडको वर्धापनदिनाचा काळादिन आंदोलन, २४ जानेवारीचे विमानतळ कामबंद आंदोलन अशी भव्य आंदोलने केली. पण सिडको आणि महाराष्ट्र सरकार प्रकल्पग्रस्त भूमिपूत्रांच्या या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आली आहे. त्यामुळे येथील भूमिपूत्रांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

    मागील २४ जूनच्या सिडको घेराव आंदोलनात सिडकोकडे विमानतळाच्या पूर्वीचा नामकरणाचा ठराव विखंडित करून लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा ठराव करावा, असे निवेदन दिले होते. मात्र वर्ष उलटले तरी त्यावर सिडको अथवा शासनाने कोणताही निर्णय केलेला नाही. सिडकोच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या ९ व्या स्मृतिदिनी म्हणजे २४ जून रोजी सकाळी ११ वाजता सिडको घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याचे कृती समितीच्यावतीने सांगतानाच आंदोलनात भूमिपुत्रांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.