शून्य कचरा ही चळवळ नागरिकांनी रुजवली पाहिजे : कविता कडू भोंगाळे

    पिंपरी : महानगरांमध्ये सध्या कचऱ्याची समस्या अत्यंत बिकट होत आहे.त्यामुळे सोसायटी, घराचा परिसर येथेच नागरिकांनी निर्माण झालेल्या कचऱ्याचे विघटन होणे ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे आता ‘शून्य कचरा’ ही चळवळ नागरिकांनी रुजवली पाहिजे, असे मत गायत्री सखी मंचच्या अध्यक्षा कविता कडू भोंगाळे यांनी पिंपरी चिंचवड महानगर पालिकाने राबविलेल्या शून्य कचरा व्यवस्थापन या उपक्रमा दरम्यान व्यक्त केले.

    गायत्री सखी मंच व भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी परिसरातील तनिश संस्कृती, बंसल सिटी, इंदुबन सोसायटी, स्वामी समर्थ सोसायटी इत्यादी गृहनिर्माण संस्थामध्ये गायत्री सखी मंचच्या अध्यक्षा कविता कडू भोंगाळे यांनी उपस्थित राहून महिला भगिनींनी शून्य कचरा व्यवस्थापन उपक्रम राबविण्याचे महत्व आवश्यकता तसेच गृहनिर्माण संस्थांनी घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा व मलनि:स्सारण यंत्रणा उभी केल्यास त्यांना साफ सफाई करात त्यांना २० ते ५० टक्के सवलत मिळू शकते. इत्यादी बाबत सविस्तर माहीती दिली.

    या उपक्रमादरम्यान गायत्री सखी मंच द्वारा भेट देण्यात आलेल्या प्रत्येक गृहनिर्माण सोसायटी मधील महिलांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राबविलेल्या या योजनेचे स्वागत केले. अशा प्रकारच्या लोकोपयोगी योजना सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी राबविणे गरजेचे आहे. जेणेकरून नागरीकाच्या आरोग्याचा व परिसराच्या स्वच्छतेचा गंभीर प्रश्न मार्गी लागतो व जनसामान्यांना देखील आर्थिक लाभ मिळतो. असे मत या वेळी कविता कडू भोंगाळे यांनी व्यक्त केले.

    सोसायट्यांचा शून्य कचरा उपक्रमासाठी पुढाकार

    जनहिताच्या अशा विविध योजना सक्रिय पद्धतीने राबविल्यास जनसामान्याचा सदर योजनांना उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त होतो व शासन योजना देखील बहुतांशी यशस्वी ठरतात. असे मत उपस्थित सर्व गृहनिर्माण सोसायटीच्या सर्व अध्यक्षांनी व सभासदांनी व्यक्त केले.तसेच शून्य कचरा हा उपक्रम सोसायटीमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करून असा विश्वास यावेळी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.