
पुणे : महाराष्ट्राचे ऑलिंपिक कास्यपदक विजेते मल्ल खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच 15 जानेवारी हा यापुढे राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार अशी घोषणा करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीवनगौरव पुरस्कारासाठी पाच लाख रुपये तर अन्य पुरस्कारांसाठी तीन लाख रुपये देणार असल्याचेही जाहीर केले.
पुरस्कार सोहळ्याची रक्कम वाढवली
महाराष्ट्र शासनाच्यावतीने सन २०१९-२०, सन २०२०- २१ व सन २०२१-२२ या वर्षासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, खेळाडू पुरस्कार, एकलव्य खेळाडू पुरस्कार (दिव्यांग खेळाडू), साहसी क्रीडा पुरस्कार व जिजामाता पुरस्कारांचे वितरण आज येथे शानदार सोहळ्यात करण्यात आले. या समारंभात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.
राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह क्रीडा मंत्र्यांची उपस्थिती
बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा नगरी येथे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार वितरण साेहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणात केलेल्या मागण्या मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्य करीत वरील घाेषणा केली. यावेळी राज्यपाल रमेश बैंस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री गिरीष महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसाेडे, खासदार श्रीरंग बारणे, प्रधान सचिव रणजितसिंग देवल आदी उपस्थित हाेते.
हे राज्य सरकार खेळाडूंच्या पाठीशी
पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे राज्य सरकार खेळाडूंच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली. तसेच, ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राची मुद्रा उमटविण्यासाठी सर्व सहकार्य खेळाडूंना केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले. खेलाे इंडीया, राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात हाॅकीचे जादुगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस ( २९ ऑगस्ट ) हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाताे. त्याचप्रमाणे देशाला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस १५ जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करावा, अशी मागणी केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पुरस्काराच्या रक्कमांचा उल्लेख केला. ही रक्कम वाढविण्यात यावी, ती अनुक्रमे तीन लाख आणि पाच लाख रुपये इतकी करावी, अशी मागणी त्यांनी केली. या मागण्या मान्य करताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य क्रीडा दिन आणि पुरस्काराच्या रक्कमेत वाढ करण्याची घाेषणा केली.
राज्यपालांचे युवकांची व्यसानाधिनता आणि मुलांचे मोबाईल गेमवर व्यक्त केली चिंता
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रीडा क्षेत्रासाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. तसेच, या क्षेत्रासाठी अजुन बरेच काही करायचे आहे. या क्षेत्राला न्याय देण्याची भूमिका घेऊ असे आश्वासन दिले. राज्यपाल बैंस यांनी शाळकरी मुलांमध्ये माेबाईल वापराच्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली. माेबाईलवर गेम खेळत बसल्याने मुलांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. तसेच, युवकांमध्ये व्यसनाधिनता वाढत आहे. या प्रश्नावर शिक्षणात खेळांचा समावेश केला पाहिजे. स्थानिक खेळांना प्राधान्य देऊन ते खेळले पाहीजे.
राज्यपालांनी महाराष्ट्रातील खेळाडूंच्या कामगिरीचे केले कौतुक
अजुर्न पुरस्कार, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी चांगले खेळाडू घडविण्यासाठी प्रशिक्षकाची भूमिका बजवायला हवी. महाराष्ट्राकडे देशाची क्रीडा राजधानी म्हणून पुढे येण्याची क्षमता आहे. हे महाराष्ट्रातील खेळाडूंनी केलेल्या आंतरराष्ट्रीय कामगिरीवरून लक्षात येते, असे त्यांनी नमूद केले. तसेच फुटबाॅल या खेळाच्या वाढीसाठी जर्मनीतील क्लबबराेबर केलेल्या कराराविषयी बैंस यांनी समाधान व्यक्त केले.