
गेल्या दीड महिन्यापासून आजारपणामुळे सक्रिय कामकाजात भाग न घेणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्वांना सुखद धक्का देत ३७ दिवसानंतर अचानकपणे विधान भवनाला भेट देत तेथील अधिवेशनाच्या तयारीची पाहणी केली.
मुंबई : गेल्या दीड महिन्यापासून आजारपणामुळे सक्रिय कामकाजात भाग न घेणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्वांना सुखद धक्का देत ३७ दिवसानंतर अचानकपणे विधान भवनाला भेट देत तेथील अधिवेशनाच्या तयारीची पाहणी केली. सायंकाळी मुख्यमंत्र्यांना अचानक विधानभवानात आल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, मुख्यमंत्र्यानी विधान भवनातील मुख्यमंत्री कार्यालय, समिती सभागृहात जाऊन माहिती घेतली. डॉक्टरांच्या सल्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी चालण्याचाही सराव केल्याची माहिती मिळाली आहे.
राजकीय मैदानात उपस्थितीबाबत रंगीत तालीम
मुख्यमंत्र्यांना पाठ आणि मानेच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी दहा नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना 22 दिवसांनी २ डिसेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, त्यानंतरही त्यांनी घरातूनच कामकाज सुरू ठेवले होते. येत्या आठवड्यात मुंबईत पाच दिवसांचे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन होत आहे. त्यामुळे या राजकीय मैदानात उपस्थितीबाबत रंगीत तालिम घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अचानक विधान भवनाच्या भेटीला आल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
यामागे नेमके रहस्य काय?
मुख्यमंत्री बरे झाले आणि त्यांनी चालण्याचा सराव केला ही आनंदाची बातमी आहे. मात्र, त्यांच्या अचानक विधानभवन भेटीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. राणे यानी म्हटले आहे की, मुख्यमंत्री विधानभवनात गेले तर ही चांगली बातमी आहे. पण ते तिथे असताना सीसीटीव्ही का बंद केले होते? विधानभवनाच्या कर्मचार्यांना संध्याकाळी ६ वाजता बाहेर जाण्यास का सांगण्यात आले? यामागे नेमके रहस्य काय आहे? असे सवाल राणे यांनी उपस्थित केले आहेत.