अधिवेशनाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार का?; आदित्य ठाकरे म्हणतात…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थाच्या मुद्यावर त्यांच्या दालनात तसेच दोन्ही सभागृहात त्यांना चालत येण्यासाठी रेलिंगची तसेच आधाराची व्यवस्था करण्यात आली आहे. तर सभागृहात त्यांच्या आसनाची उंची वाढविण्यात आली आहे.

    मुंबई : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होऊन दोन दिवस झाले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विधिमंडळात हजेरी लावली नसल्याने मुख्यमंत्री आता या सत्रादरम्यान येणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांची प्रकृती चांगली आहे. ते सोमवारी अधिवेशनास उपस्थित राहतील, अशी माहिती मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिली.

    दोन दिवसांपासून अनुपस्थित

    राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, आजारी असल्याने सध्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अधिवेशनात उपस्थित राहू शकले नाहीत. दरम्यान त्यांच्या अनुपस्थितीवरून विरोधकांकडून शिवसेनेवर टीका केली जात आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत नियम २९३ अन्वये चर्चेला सुरूवात करतानाही मुख्यमंत्री हजर राहिले नसल्याचा उल्लेख करत त्यांच्या प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त केली.

    विधानभवनात विशेष व्यवस्था

    दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थाच्या मुद्यावर त्यांच्या दालनात तसेच दोन्ही सभागृहात त्यांना चालत येण्यासाठी रेलिंगची तसेच आधाराची व्यवस्था करण्यात आली आहे. तर सभागृहात त्यांच्या आसनाची उंची वाढविण्यात आली आहे. जेणेकरून त्याना सहजपणे खुर्चीत बसता यावे अशी व्यवस्था करण्यात आली आहे.