विदर्भात थंडीचा जोर वाढणार; पारा १३ डिग्रीपर्यंत खाली येणार

आगामी दिवसांमध्ये हवेत हलकासा गारवा असेल. सोमवारचे तापमान सामान्य असल्याचे हवामान विभागाने वर्तविले. सकाळी हलकी थंडी राहील. दिवसाचे तापमान सामान्य राहील. रात्रीच्या वेळेस पारा आणखी खाली जाऊ शकतो.

    नागपूर (Nagpur):  शहरात थंडीची तीव्रता वाढली आहे. ढगाळ वातावरण हटताच शहरात तापमानाचा पारा खाली आल्याचे जाणवत आहे. नागपूर जिल्ह्यातील रविवारचे तापमान 15.8 डिग्री नोंदविण्यात आले. परंतु पुढील 4-5 दिवसांत ते 13 डिग्री सेल्सिअसपेक्षा खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मागील 3 दिवसांपासून शहरातील ढगाळ वातावरणामुळे तापमानात किंचितशी वाढ झाली होती. ढग हटताच वातावरणात गारठा पसरला आहे. शहरात रविवारी 29.8 डिग्री तामपनाची नोंद करण्यात आली.

    आगामी दिवसांमध्ये हवेत हलकासा गारवा असेल. सोमवारचे तापमान सामान्य असल्याचे हवामान विभागाने वर्तविले. सकाळी हलकी थंडी राहील. दिवसाचे तापमान सामान्य राहील. रात्रीच्या वेळेस पारा आणखी खाली जाऊ शकतो. पुढील 4-5 दिवसांपर्यंत हवामान उघडण्याची शक्यता विभागाने वर्तविली आहे. 13 डिसेंबरपर्यंत तापमानात सातत्याने घसरण होण्याची शक्यता आहे. विदर्भात गोेंदियात रविवारचे तापमान सर्वांत कमी म्हणजे 13.8 डिग्री सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.

    दरम्यान अकोल्याचे तापमान 18.0 डिग्री सेल्सिअस, अमरावती 16.0, बुलढाणा 17.2, ब्रम्हपुरी 15.8, चंद्रपुर 17.2, गडचिरोली 16.4, वर्धा 16.4, वाशिम 19.0, यवतमालचे तापमान 15.5 डिग्रील सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. हवामान खात्याने विदर्भात आगामी दिवसात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.