नदी उत्सवाची सांगता जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्या हस्ते महाआरतीने

महाबळेश्वर येथील पंचगंगा मंदिरात गंगा पूजन व गंगेच्या महाआरतीने जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्या हस्ते व उपवनसंरक्षक महादेव मोहीते यांच्या प्रमुख उपस्थितीत गेली आठवडाभर सुरू असलेला नदी उत्सवाची सांगता करण्यात आली.

    महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील पंचगंगा मंदिरात गंगा पूजन व गंगेच्या महाआरतीने जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्या हस्ते व उपवनसंरक्षक महादेव मोहीते यांच्या प्रमुख उपस्थितीत गेली आठवडाभर सुरू असलेला नदी उत्सवाची सांगता करण्यात आली. वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत 21 डिसेंबरला तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांच्या हस्ते क्षेत्र महाबळेश्वर येथील कृष्णा नदीच्या उगम स्थानावर असलेल्या मंदिरात जल पूजन करून नदी उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.

    या उत्सवाची सांगता आज पंचगंगा मंदिरात करण्यात आली. जिल्हाधिकारी शेखरसिह यांच्यासह उपवनसंरक्षक महादेव मोहिते, माजी जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्विनी सातपुते, तहसीलदार सुषमा चौधरी पाटील व वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी हे देखील उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कृष्णा नदीच्या उगमावर असलेल्या मंदिरात शंभू महादेवाला अभिषेक करण्यात आला. या ठिकाणावरून वाजत गाजत मान्यवरांचे आगमन पंचगंगा मंदिरातील मुख्य कायर्क्रमस्थळी झाले. पंचगंगा मंदिर मशाली रांगाळ्या व फुलांनी सजविण्यात आले होते. या ठिकाणी प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. त्यानंतर गो-मुखातून पाणी पडते. त्या जलकुंडाच्या काठावर बसून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिषेक करून जलपूजन करण्यात आले.