काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात राजीनाम्याच्या पवित्र्यात

    मुंबई : विधानपरिषदेचा निकाल (MLC Election) लागल्यापासून महाविकास आघाडीत (MVA) खदखद बाहेर येत आहे. भाजपच्या (BJP) पाचही जागा निवडून आणल्याने राज्यात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे (Congress) गटनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे राजीनामा (Resign) देण्याची शक्यता आहे.

    महाविकास आघाडीतील काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाल्याने ‘ब्लेमगेम’ला सुरुवात झाली आहे. नाराजीनाट्य वाढल्याने काँग्रेसमधील उमेदवारांनीदेखील क्रॉसवोटिंग केल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाचा आदेश धुडकावल्याने आता जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्यावर आली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गटनेता पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

    यंदा विधानपरिषदेसाठी काँग्रेसने दोन उमेदवार दिले होते. यामध्ये भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात महत्वाची लढत होती. चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार होते. मात्र, पहिल्या पसंतीच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि भाई जगताप विजयी झाले. दहाव्या जागेसाठी भाई जगताप यांचा विजय होणार की प्रसाद लाड विधानपरिषदेवर जाणार, अशी चर्चा होती. परंतू, काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉसवोटिंग झाले.

    महाविकास आघाडी म्हणून पुन्हा विचार करावा लागेल – थोरात
    विधान परिषदेच्या निवडणुकीत आमच्या आमदारांचीच काही मते आम्हाला मिळाली नाहीत, हे मान्य करावे लागेल. माझी भावना पक्षश्रेष्ठींना कळवणार आहे. या स्थितीत महाविकास आघाडी म्हणूनदेखील विचार करावा लागणार आहे. सरकारला अडीच वर्षे झाली आहे. त्यामुळे सरकार म्हणून आम्हाला विचार करावा लागणार आहे, असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.