ब्रिटनमध्ये कोरोनाचा हाहा:कार, गेल्या २४ तासांमध्ये आढळले १ लाख २२ हजार रुग्ण

ब्रिटनमध्ये बाधितांची संख्या वाढत असून शुक्रवारी २४ तासांमध्ये एक लाख २२ हजार १८६ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, १३७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. ब्रिटनमध्ये एकाच आठवड्यात ४८ टक्क्यांनी बाधितांची संख्या वाढली आहे.

    नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असताना दुसरीकडे कोरोना महासाथ पुन्हा एकदा फैलावू लागली आहे. ब्रिटनमध्ये बाधितांची संख्या वाढत असून शुक्रवारी २४ तासांमध्ये एक लाख २२ हजार १८६ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, १३७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. ब्रिटनमध्ये एकाच आठवड्यात ४८ टक्क्यांनी बाधितांची संख्या वाढली आहे.

    दरम्यान युरोपीय देशांमध्ये कोरोना संसर्गाची लाट आली असून बाधितांची संख्या वाढत आहे. यामध्ये ब्रिटनमध्ये सर्वाधिक बाधितांची नोंद होत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येचे उच्चांक मोडत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. तर, दुसरीकडे बाधितांची संख्या वाढत चालली आहे.  ब्रिटनच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे जवळपास एका आठवड्यात बाधितांची संख्या ४८ टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका आठवड्यात ब्रिटनमध्ये जवळपास ७ लाखांहून अधिक नागरीक कोव्हिड बाधित आढळले आहेत. आरोग्य विभागाने जारी केलेल्या डेटानुसार, ब्रिटनमध्ये रुग्णालयात दाखल होण्याचा दर आठ टक्क्क्यांनी वाढला आहे.

    पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे आवाहन

    ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लोकांना घरातच थांबवण्याचे आवाहन केले. नाताळ आणि नवीन वर्षाच्यानिमित्ताने आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली आहे. सर्व नागरिकांनी लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले.

    रुग्णालयात दाखल न होताच ७० टक्के रुग्ण बरे

    कोरोनाच्या या आधीच्या व्हेरियंटच्या तुलनेत ओमायक्रॉनची बाधा झालेल्या ५० ते ७० टक्के रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याची गरज पडली नाही असं ब्रिटनच्या हेल्थ सिक्युरिटी एजन्सीच्या अहवालात सांगण्यात आलं आहे. तसेच कोरोना लसीचा बुस्टर डोस घेतल्यानंतर १० आठवड्यामध्ये ओमायक्रॉनचा धोका टळल्याचं समोर आलं आहे असंही या अहवालात म्हटलं आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी ब्रिटनच्या हेल्थ सिक्युरिटी एजन्सी ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, डेन्मार्क, इंग्लंड आणि स्कॉटलंड या देशातील रुग्णांचा अभ्यास केला.

    ब्रिटनमध्ये नोव्हेंबरमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर आतापर्यंत १३२ रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तर ओमायक्रॉनची लागण झाल्यापासून २८ दिवसांमध्ये एकूण १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांपैकी ५० ते ७० टक्के रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याची गरज भासली नाही.