इस्लामपुरात नगरपालिकेच्या सभेत गोंधळ; विकास आघाडीच्या नगरसेवकांनी प्रशासनाचा निषेध करत केला सभात्याग

जुन्या सभेतील अनेक ठरावांची अंमलबजावणी नाही. तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी असूनही कामांच्या निविदा निघाल्या नाहीत.

    इस्लामपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जुन्या सभेतील अनेक ठरावांची अंमलबजावणी नाही. तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी असूनही कामांच्या निविदा निघाल्या नाहीत. प्रशासन काय करत आहे? भुयारी गटर कामाबाबत सरकारी वकिलांचे म्हणणे घेतले का? असे प्रश्न उपस्थित करत विकास आघाडी शिवसेनेच्या नगरसेवकांनी नगरपालिकेच्या सभेत गोंधळ घातला. प्रशासनाचा निषेध नोंदवून सभात्याग करत मुख्याधिकारी दालनाच्यासमोर उपोषणासाठी बैठक मारली. गोंधळानंतर सभा तहकूब झाली. ही सभा आता सोमवारी (ता. १३) होणार आहे.

    सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात गोंधळ सुरू झाला. विकास आघाडीच्या नगरसेवकांनी याला सुरुवात केली. सभात्यागानंतर राष्ट्रवादीनेही सभा तहकूब करण्याची मागणी केली. नगराध्यक्षांनी आग्रह करूनही राष्ट्रवादी भूमिकेवर ठाम राहिल्याने सभा तहकूब करावी लागली. सभागृहात विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसने एकमेकांच्याविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.

    २२ मार्च २०२१ ला तहकूब झालेल्या सर्वसाधारण सभेचे आज पुन्हा आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या उपस्थित होते.

    विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील, उपाध्यक्ष वैभव पवार, शिवसेनेचे शकील सय्यद, नगरसेवक अमित ओसवाल यांनी अगदी सुरवातीलाच प्रश्नांची सरबत्ती सुरू करत गोंधळ घातला.

    दरम्यान, राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे, विश्वास डांगे, खंडेराव जाधव, शहाजी पाटील यांनी या प्रश्नांना आक्षेप घेत विषयपत्रिकेतील विषयांवरच चर्चा व्हावी, अशी भूमिका घेतली. त्याला नकार देत यांचा शहराच्या विकासाला विरोध आहे. त्यामुळे आडवे पडत आहेत.

    प्रशासनाला हाताशी धरून विकासकामात अडथळा आणला जात आहे, असा आरोप आघाडीच्या नगरसेवकांनी केला.

    शहरातील विकासाच्या कामाला राष्ट्रवादी काँग्रेस सहकार्य का करत नाही? असा सवाल सुप्रिया पाटील यांनी उपस्थित केला. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विकास आघाडीच्या विरोधात निषेध नोंदवत घोषणाबाजी केली. अपयशी सत्ताधाऱ्यांचा निषेध असो अशा घोषणा दिल्या.

    आघाडीच्या सर्वांनी डोक्याला काळ्या पट्ट्या बांधत सभागृहात निषेध नोंदवला आणि सभात्याग केला. सभागृहातून बाहेर पडत मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या दालनासमोर बैठक मारली. निषेधाच्या घोषणा दिल्या. इकडे सभागृहात पुढचे विषय वाचण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी प्रशासनाला केल्या; मात्र राष्ट्रवादीने ही सभाच तहकूब करण्याची भूमिका घेतली.

    नगराध्यक्ष पाटील यांनी असे न करण्याची विनंती केली. काही महत्त्वाच्या विषयांवर निर्णय होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. पाच मिनिटांची वेळ घेऊन सभा तहकूब करण्यात आली.

    दरम्यान, नगराध्यक्ष पाटील यांनी आघाडीच्या नगरसेवकांची चर्चा करून पुन्हा सभागृहात आणले ते काळ्या फिती बांधूनच सभागृहात आले.

    आजही झालेला प्रकार निंदनीय व शहराच्या इतिहासातील अत्यंत वाईट घटना असल्याचे नमूद करत सभा तहकूब करण्याची सूचना मांडली. शहाजी पाटील यांनी त्याला अनुमोदन दिले.

    नगराध्यक्षांनी विनंती करूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते भूमिकेवर ठाम राहिले . त्यामुळे सभा तहकूब करावी लागली.

    – संजय कोरे, गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेस.