केंद्र आणि राज्य कार्यकारीणी नंतर भाजपची चुका आणि उणिवाची दुरूस्ती

  मुंबई (Mumbai) :  भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय तसेच राज्य कार्यकारीणीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सत्ता केंव्हा येणार याबद्दल वाट पहात न बसता जनतेच्या प्रश्नांवर प्रखर विरोधीपक्ष म्हणून कामाला लागण्याचे आवाहन सर्वच प्रमुख नेत्यानी केल्याचे पहायला मिळाले. त्याशिवाय २०१४च्या विधानसभा निवडणुकांच्या काळात पक्षाकडून कळत नकळत झालेल्या चुका आणि उणिवा देखील दुरूस्ती सुरू झाल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यादृष्टीने दुरावलेल्या स्वपक्षीय नेत्याचे पुनर्वसन करताना जुन्या सेना भाजप युतीच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी चाचपणी केली जात असल्याचे संकेत मिळत आहेत.

  तावडे, बावनकुळेना पुन्हा अच्छे दिन
  त्याचाच भाग म्हणून माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानपरिषदेच्या माध्यमातून सक्रीय करण्यासाठी नागपुरातून निवडणूक रिंगणात आणले जात आहे. तर २०१४मध्ये उमेदवारी नाकारण्यात आलेल्या विनोद तावडे या दुस-या दिग्गज नेत्याचे पुनर्वसन करताना त्याना राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती केल्याची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली आहे. दिवंगत प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर तावडे यांच्या रूपाने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील दिग्गज नेत्याला महत्वाच्या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.

  अडगळीत गेले तावडे, बावनकुळे
  महत्वाचे म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत याच तावडे यांना पक्षाने उमेदवारी नाकारली होती. मात्र वर्षभरापूर्वी त्यांना राष्ट्रीय चिटणीस म्हणून जबाबदारी देत भाजपशासित हरियाना राज्याचे प्रभारी तसेच पंतप्रधान कार्यालयातील ‘मन की बात’ व विविध केंद्र सरकारच्या योजना याची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. आता राष्ट्रीय सरचिटणीसपदाने तावडेच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात सत्ता नसताना १९९९ ते २०१४ या काळात भाजप आणि परिवाराला तावडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या खालोखाल प्रभावी विरोधीपक्ष नेता म्हणून मुंबई तसेच उर्वरित महाराष्ट्रात ओळख मिळवून दिली होती. नितीन गडकरीं यांच्या बरोबरीने तावडे यानी भाजपला पुढे नेण्यात सक्रिय भूमिका निभावली. मात्र तावडे नंतरच्या काळात काहीसे बाजूला फेकले गेले होते. फडणवीस सरकारमध्येही त्यांच्याकडे तुलनेने बिनमहत्वाचे समजले जाणारे शिक्षण खाते सोपवले गेले.

  निवडणुकांमध्ये भाजपचा बहुजन चेहरा
  तावडे, बावनकुळे यांच्या नियुक्तीच्या पाठीमागे येत्या काळात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये भाजपचा बहुजन चेहरा दिसावा असा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. नारायण राणे यांच्यासारख्या अन्य पक्षांतून येणा-या नेत्यांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रात बळ देण्यात आले. मात्र त्यानंतर राणे यांच्या अटकेच्या प्रकरणानंतर त्यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा आणि जुना मित्र शिवसेनेशी प्रसंगी जुळवून घेण्याची क्षमता नसल्याचे दिसून आले असे जाणकारांचे मत आहे त्यामुळे विनोद तावडे यांची नियुक्ती महत्वाची असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी ओबीसी, मराठा समाजाच्या या दोन नेत्यांचा भाजपमधील राजकारणासाठी योग्य उपयोग होवू शकतो हेओळखून २०१४ मधील चूक सूधारत त्यांचे पुनर्वसन करत नेतृत्व देण्याची तयारी केल्याचे संकेत भाजपसाठी आगामी काळात फायद्याचे ठरणार आहेत.

  जुन्या संबंधातून नवा राजकीय अध्याय सुरू करण्याचे संकेत
  त्यासोबतच शिवसेनेशी जवळीक आणि जुन्या संबंधातून नवा राजकीय   अध्याय सुरू करण्याचे संकेतही भाजपाने दिल्याचे मानले जात आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मुंबईमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता या कार्यक्रमानंतर सिंह यांनी रश्मी ठाकरे यांना फोन करत उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तसेच ठाकरेंच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली. यावरून येत्या काळात मुंबईसह राज्यातील महत्वाच्या महापालिका निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा भाजप सेना युती होण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत देखील चाचपणी केली जावू शकते असे जाणकार सूत्रांचे मत आहे.