बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणारे सराईत गुन्हेगार अटकेत

बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगार आणि त्याची विक्री करणाऱ्या तिघांना खडकी पोलीसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि चार काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. या तिघांची कारागृहात मैत्री झाली होती. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पिस्तूलांची देवाण-घेवाण केली.

    पुणे : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगार आणि त्याची विक्री करणाऱ्या तिघांना खडकी पोलीसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि चार काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. या तिघांची कारागृहात मैत्री झाली होती. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पिस्तूलांची देवाण-घेवाण केली.

    धनाजी उर्फ धना दिलीप रूपनर (वय २४, रा. लोहगाव), अनिकेत राजेंद्र डिचोलकर (वय २३, रा. कर्वेनगर) आणि श्रीनाथ संजय वाघमारे (वय २४, रा. कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शहरात गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी स्थानिक पोलीसांसह गुन्हे शाखा हद्दीत गस्त घालत आहे. यादरम्यान, खडकी पोलीस हद्दीतील गुन्हेगारांची माहिती घेत असताना कर्मचारी अनिरूद्ध सोनवणे व भगवान हंबर्डे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेंजहिल्स फुटबॉल ग्राऊंडच्या परिसरात एकजन पिस्तूल घेऊन थांबला आहे. या माहितीची खातरमजा करण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक मोहन साळवी व पथकाने येथे सापळा रचून धनाजी याला पकडले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ १ गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतूस मिळाले. त्याची चौकशी केल्यानंतर मित्र अनिकेत याच्या मध्यस्थीने हे पिस्तूल श्रीनाथ याच्याकडून घेतल्याचे सांगितले.

    पोलीसांनी अनिकेतला पकडत त्याच्याकडून एक पिस्तूल व दोन जिवंत काडतूसे जप्त केली. तर, श्रीनाथ याला देखील पकडले. तिघेही पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांची कारागृहात ओळख झाली होती. त्यातून त्यांची मैत्री झाली असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे.

    दरम्यान, ही कारवाई पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक संगिता जाधव, उपनिरीक्षक मोहन साळवी व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.