महाएनजीओ फेडरेशनच्या युवक संवाद शिबिरास दहिवडी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दोन हजार सामजिक संस्थांची शिखर संस्था असणाऱ्या महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून महा एनजीओ युथ विंगची निर्मिती करण्यात आली.

  वडूज : दोन हजार सामजिक संस्थांची शिखर संस्था असणाऱ्या महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून महा एनजीओ युथ विंगची निर्मिती करण्यात आली. ज्याचा मुख्य विषय युवकांशी संवाद साधत त्यांना सेवाकार्यात आणणे हा होय. प्राचार्य डॉ. एस टी साळुंखे यांच्या मार्गदर्शनानुसार व उपप्राचार्या नंदिनी साळुंखे यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे दहिवडी कॉलेजच्या हजारो विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.

  योग, प्राणायाम, एकाग्रता, कौशल्य विकास व महत्वाचे म्हणजे आपला अभ्यास अशा विविध विषयांवर ह.भ.प.अक्षयमहाराज भोसले यांनी महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने युवकांना मार्गदर्शन केले. शेखरजी मुंदडा व चंद्रकांतजी राठी यांनी एमएनएफ युथ विंगच्या उपक्रमास विशेष सहकार्य केले.

  आर्ट ऑफ लिविंगचे अभय तोडकर व सहकारी यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी वर्गाकडून नवचेताना शिबिर करुन घेतले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात श्रमदान करत संवाद मेळाव्यात ऐकलेले कृतीत आणले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाणिज्य विभाग प्रमुख मस्के व्ही. एस., मोहिते एम. आर., निकम एन.व्ही. यांनी सहकार्य केले.

  डॉ.आंबेडकर असे सांगत असत की ज्या कोणास आपल्या बुद्धीचा प्रभाव वाढवावयाचा आहे त्यांनी श्रम, सेवा केली पाहिजे. महत्वाकांक्षेशिवाय मनुष्य धडपड व प्रयत्न करूच शकत नाही. तरुणांनी आशा कधीच सोडू नये. दहिवडी कॉलेजचे सर्व विद्यार्थी अत्यंत प्रमाणिकतेने ह्या संवाद शिबिराचा लाभ घेतात ही आनंदाची बाब – अक्षयमहाराज भोसले, कार्यकारी संचालक : महा एनजीओ फेडरेशन

  महा एनजीओ फेडरेशन ही संस्था आमच्या महा विद्यालयाप्रमाणे कर्मवीर अण्णांचा विचार कृतीद्वारे महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांमध्ये रुजवते ही महत्वाची बाब आहे. कोरोनासारख्या महाभयंकर रोगाच्या पार्श्वभूमीवर भयमुक्त झालेल्या विद्यार्थ्यांना शारीरिक व्यायामाची, योगासनाची आणि योग्य आहाराची गरज ओळखून आणि शरीराची व सामाजिक भान राखत स्वच्छता मोहीम विद्यार्थ्यांच्या अंगी रुजावी हे महत्वाचे आहे. यासाठी हे शिबीर मोलाचे ठरेल.

  – प्राचार्य एस. टी. साळुंखे, दहिवडी कॉलेज, दहिवडी