दुग्धव्यवसाय हा शेतीपूरक : अजित पवार

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या प्लँटचे उद्घाटन

    जळगाव : दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय आहे. या व्यवसायातून आर्थिक सुबत्ता येण्यास मदत होते. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सहकार चळवळीचे बळकटीकरण आवश्यक आहे. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत झाली पाहिजे, अशीच सरकारची भूमिका आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले.

    या प्लांटचे उदघाटन
    जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, जळगाव यांच्या पाच लाख लिटर क्षमतेचा नवीन आधुनिक दूध प्रक्रिया प्लांट आणि नवीन दुग्धजन्य पदार्थ उत्पादन प्लांटच्या उद‌्घाटन सोहळा आज सकाळी पार पडला. त्यांच्या हस्ते नवीन आधुनिक दूध प्रक्रिया प्लांटचे तर पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते श्रीखंड, लस्सी व पनीर या दुग्धजन्य पदार्थ उत्पादन सयंत्राचे उद‌्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

    सर्वच घटकांना दिलासा : पाटील
    जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाने आपली क्षमता साडेतीन लाख लिटरवरून पाच लाख लिटरपर्यंत वाढविली आहे. सांघिक कामगिरीमुळे हे शक्य झाले आहे. दुधावर प्रक्रिया करीत दुग्धजन्य उत्पादन वाढेल, असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला. राज्यातील शासनाने ‘कोविड- १९’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या. नागरिकांना आरोग्याच्या विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. अतिवृष्टी, वादळ यासह आलेल्या नैसर्गिक संकटांना राज्य शासनाला सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत राज्य शासनाने शेतकऱ्यांसह सर्वच घटकांना दिलासा देण्याचे काम केले आहे.

    प्रस्तावित प्रकल्प
    जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाची १९७१ मध्ये स्थापना झाली. यंदा संघाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षात संघाच्या नवीन प्रकल्प कार्यान्वित होत आहे ही समाधानाची बाब आहे. धवल क्रांतीचे भारतातील जनक डॉ. वर्गीय कुरियन यांच्यामुळे संघाला उर्जितावस्था प्राप्त झाली. सध्या ३७ कोटी रुपयांच्या ठेवी संघाच्या आहेत. तीन कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. हे सर्व सभासदांनी दाखविलेल्या विश्वासामुळे शक्य झाले आहे. आगामी काळात दूध भुकटी, पशुखाद्य आणि विस्तारीकरणाचा प्रकल्प प्रस्तावित आहे, असेही त्यांनी सांगितले.