गर्भवती महिलेच्या प्रसुतीवेळी नवजात बाळाचा मृत्यू, डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याचा नातेवाईकांचा आरोप

यावेळी त्यांचे नातेवाईक विशाल गायकवाड, ज्योती बल्लाळ, नवनाथ बल्लाळ, निलेश मोरे हे ही हॉस्पिटलमध्ये हजर होते. डॉ. गदादे यांनी रुग्ण महिलेला तपासत रात्री साडे दहाच्या सुमारास प्रसुती करावी लागेल, नैसर्गिक प्रसुती होणार नाही, सिझर करावे लागेल असे सांगितले. त्यानंतर रात्री पावणे नऊच्या सुमारास डॉक्टर दवाखान्यातून बारामती येथील एका कार्यक्रमासाठी निघून गेले.

    बारामती : नवराष्ट्र न्यूज नेटवर्क , बारामती शहरात प्रसुतीसाठी खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या गर्भवती महिलेच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार नुकताच घडला आहे.वेळेत उपचार न मिळाल्याने तसेच प्रसुतीच्या नेमक्या वेळी डॉक्टर उपस्थित नसल्याने नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या पतीने केला आहे. या प्रकरणी संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा,तसेच कामात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी महिलेच्या पतीने केली आहे.

    याबाबत गोपाळ तुकाराम गायकवाड (रा. प्रतिभानगर, बारामती) यांनी उपविभागीय पोलिस अधिका-यांसह शहर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना तक्रारी अर्ज दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,१४ नोव्हेंबर पासून बारामती शहरातील शिवनंदन हॉस्पिटल मधील स्त्रीरोगतज्ञ डॉ. तुषार गदादे यांच्याकडे गायकवाड यांच्या पत्नीवर उपचार सुरु होते. दि. २२ डिसेंबर रोजी गायकवाड यांच्या पत्नीच्या पोटात दुखू लागल्याने त्यांच्या कुटुंबियांनी शिवनंदन हॉस्पिटलमध्ये डॉ. गदादे यांच्याकडे त्यांना दाखल केले.

    यावेळी त्यांचे नातेवाईक विशाल गायकवाड, ज्योती बल्लाळ, नवनाथ बल्लाळ, निलेश मोरे हे ही हॉस्पिटलमध्ये हजर होते. डॉ. गदादे यांनी रुग्ण महिलेला तपासत रात्री साडे दहाच्या सुमारास प्रसुती करावी लागेल, नैसर्गिक प्रसुती होणार नाही, सिझर करावे लागेल असे सांगितले. त्यानंतर रात्री पावणे नऊच्या सुमारास डॉक्टर दवाखान्यातून बारामती येथील एका कार्यक्रमासाठी निघून गेले. रुग्ण महिलेची प्रकृती बिघडू लागल्याने बल्लाळ यांनी फोन व मेसेजद्वारे तातडीने येण्याची विनंती डॉक्टरांना केली. रात्री साडे दहाच्या सुमारास बाळाचे पाय बाहेर आले. परंतु त्यावेळी डॉक्टर आॅपरेशन थिएटरमध्ये हजर नव्हते. रात्री सव्वा अकरा वाजता डॉक्टर आले. त्यांनी आल्यानंतर नवनाथ बल्लाळ यांना बोलावून घेत प्रसुतीला उशीर झाल्याने बाळाचे ह्दय बंद पडल्याचे सांगितले. त्यानंतर बालरोग तज्ञाकडे बाळाला हलविण्यात आले. परंतु २३ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता तेथील बालरोग तज्ञ डॉक्टरांनी बाळ मृत झाल्याची माहिती बल्लाळ यांना दिली. कुटुंबियांनी सरकारी रुग्णालयात बाळाचे शवविच्छेदन करत पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. यात डॉक्टरांनी कर्तव्यात कसूर करत योग्य उपचार न केल्यानं त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

    संबंधित महिलेला प्रसुतीसाठी दाखल केल्यानंतर योग्य उपचार सुरू केले होते. त्याचे सीसीटिव्ही फुटेज आहेत. प्रसूती झाल्यानंतर बाळाला तातडीने बाल रुग्णालयात दाखल केले होते. आम्ही प्रसूती वेळी योग्य ती खबरदारी घेतली होती. बाळाचा मृत्यू झाला. परंतु ,त्याला आम्ही जबाबदार नाही.

    डॉ तुषार गदादे