शेततळ्यात बुडून तीन बालकांचा मृत्यू ; मोहोळ तालुक्यातील शेटफळमधील घटना

खेळत खेळत शेततळ्याकडे गेलेल्या तीन लहान बालकांचा शेततळ्यात पाय घसरून पडून बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथे सोमवारी (दि. ९ मे) दुपारी दोनच्या सुमारास घडली. विनायक भरत निकम (वय १२), सिद्धार्थ भरत निकम (वय ८, दोघे रा. माचणूर) तर कार्तिक मुकेश हिंगमिरे वय ५, रा. शेटफळ) अशी मृत्यु झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली.

    मोहोळ : खेळत खेळत शेततळ्याकडे गेलेल्या तीन लहान बालकांचा शेततळ्यात पाय घसरून पडून बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथे सोमवारी (दि. ९ मे) दुपारी दोनच्या सुमारास घडली. विनायक भरत निकम (वय १२), सिद्धार्थ भरत निकम (वय ८, दोघे रा. माचणूर) तर कार्तिक मुकेश हिंगमिरे वय ५, रा. शेटफळ) अशी मृत्यु झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवेढा तालुक्यातील माचणुर येथील भरत निकम सालगडी म्हणून मजुरीसाठी त्यांची सासरवाडी शेटफळ येथे मेहुणे मुकेश ज्योतीनाथ हिंगमिरे यांच्यंाकडे आले होते. गेल्या ६ महिन्यांपासून भारत निकम पत्नी रेश्मा व मुले विनायक, सिद्धार्थ मुलांसह शेटफळ येथील महेश तानाजी डोंगरे यांचे शेतात शेत मजुरी करत होते. दरम्यान दि. ९ मे रोजी निकम पती-पत्नी नेहमीप्रमाणे सकाळी मजुरीसाठी शेतात गेले होते. आई वडिल मजुरीसाठी गेल्यावर विनायक, सिद्धार्थ व कार्तिक असे तिघे जण मिळून दुपारी खेळत होते. दुपारी दाेनच्या सूमारास रस्त्यातच असणाऱ्या जनार्धन डोंगरे यांच्या शेततळ्याकडे खेळत खेळत गेले असता पाय घसरून तिघेही शेतळ्यात पडले. सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान निकम कुटूंबियांना कामावरून घरी आल्यानंतर मुले दिसली नाहीत. म्हणून त्यांनी शोधाशोध केली असता शेततळ्याजवळ मुलांच्या चपला दिसल्या. निकम व हिंगमिरे कुटुंबियांना शेततळ्यात बुडालेली मुले दिसली. तत्काळ त्यांना बाहेर काढून मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. याबाबत कार्तिकचे वडिल मुकेश ज्योतीनाथ हिंगमिरे यांनी मोहोळ पोलीसात खबर दिली असून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास तपास हवालदार चंद्रकांत आदलिंगे करीत आहेत.

    चपला पाहताच धीर सुटला
    सायंकाळी सहा वाजता आई-वडील कामावरून घरी आले असता मुलं नाहीत हे पाहून ते घाबरले. चौकशी करीत मुलांना शोधत आई रेश्मा शेततळ्याजवळ जाताच मुलांच्या चपला दिसल्या आणि त्या मातेचा धीर सुटला. रेश्माने टाहाे फाेडत अश्रूला वाट मोकळी करून दिली.

    नातेवाईकांनी फाेडला हंबरडा
    या घटनेची माहिती मिळताच माचनूर व शेटफळ नातेवाईकांनी मोहोळ येथील ग्रामीण ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन एकच हंबरडा फोडला. परिसरात शोककळा पसरली होती. यातील केवळ ५ वर्षीय कार्तिक हा मुलगा एवढया लहान वयात आर्मी भरती व्हायचे स्वप्न पाहून दररोज पहाटे १ किमी पळत होता. मिल्ट्री भरती करणाऱ्या मुलांसमावेत तो अभ्यास करायचा. त्यांच्या आठवणी काढत मुलांच्या आईने हंबरडा फोडताच पोलिसांसह उपस्थितांना गहिवरून आले.