अंतर्गत मतभेदांमुळे राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा, दिग्गजांचा पराभव ठरणार बालेकिल्ल्यात अडचणीचा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांना गेली दोन दशके सातत्याने साथ देणाऱ्या सातारा जिल्ह्यात जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने वेगळेच चित्र समोर आले. अंतर्गत मतभेद, अतिमहत्वाकांक्षा, पक्षीय चौकट सोडलेले व्यक्तिगत पातळीवरचे राजकारण यामुळे बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीसाठी ही धोक्याची घंटा वाजली आहे.

    सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांना गेली दोन दशके सातत्याने साथ देणाऱ्या सातारा जिल्ह्यात जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने वेगळेच चित्र समोर आले. अंतर्गत मतभेद, अतिमहत्वाकांक्षा, पक्षीय चौकट सोडलेले व्यक्तिगत पातळीवरचे राजकारण यामुळे बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीसाठी ही धोक्याची घंटा वाजली आहे.

    कराडात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व जावलीत आमदार शशिकांत शिंदे तर खटावमध्ये सहकार पॅनेलचे नंदू मोरे या राष्ट्रवादी च्या उमेदवारांना राजकीय दगाफटका झाल्यास राष्ट्रवादीच्या भविष्यातील बांधणीला मोठा फटका बसणार आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचीही राष्ट्रवादीने बोळवणं केल्याने पक्षविरोधाचा सूर बळावला आहे. दस्तुरखुद्द शरद पवार यांनाच अतिक्षय चाणाक्ष व नियोजनबद्धरित्या बँकेतील अतिउत्साही राजकीय हालचालींचे राजकीय नियंत्रण करावे लागणार आहे.

    जिल्हा बँकेच्या दहा जागांसाठी अकरा तालुक्यातून अत्यंत चुरशीने 96 टक्के मतदान झाले. बँकेत विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कौशल्याने पक्षविरहित मोट बांधताना अकरा जागा बिनविरोध करताना राजघराण्यांच्या प्रतिनिधींना बिनविरोध निवडून आणत बँकेवरील राजेगटाचा प्रभाव कायम ठेवला. कराड सोसायटी मतदारसंघात भाजपच्या खुल्या मदतीने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मतदारसंघ पिंजून काढत एकतर्फी विजयाचा दावा केला तर स्व. विलासकाका उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी मी विलासकाका बोलतोय असे थेट मतदारांच्या काळजाला हात घालत वातावरण भावनिक केले. येथे प्रत्यक्ष विलासकाकांच्या राजकीय जीवनाचे संचित तर दुसरीकडे खुद्द सहकारमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथील राजकीय दगाफटका राष्ट्रवादीला अडचणीचा ठरू शकतो.

    खुद्द सहकारमंत्र्यांना आस्मान दाखविले गेल्यास त्याचा कराड उत्तरच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे. इकडे जावलीच्या रणांगणात जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या रेसमध्ये असणाऱ्या आमदार शशिकांत शिंदे यांना पक्षांर्तगत राजकारणातूनच खिंडीत गाठण्यात आल्याने शांत जावली तालुक्यात हाय व्होल्टेज ड्रामा रंगला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव सांगत अठ्ठावीस उमेदवार सोबत घेऊन शेवटपर्यंत राजकीय बाणा कायम ठेवणाऱ्या ज्ञानदेव रांजणे यांनी विजयाची खात्री देत खुद्द शरद पवारांचा प्रस्ताव अव्हेरला. त्याला वसंतराव मानकुमरे यांची साथ मिळाली.