दाट धुक्यामुळे विमानसेवा विस्कळीत; रायपूरला वळविले विमान

मंगळवारी सकाळपासून शहरात सर्वत्र धुके दाटून आले होते. संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्याचा परिणाम विमानांच्या आवागमनावर दिसून आला. दिल्ली-नागपूर हे विमान सकाळी ५.५५ वाजता उडाले. नियोजित वेळेनुसार सकाळी ७.४० वाजता विमान नागपूरला येणे अपेक्षित होते. परंतु, खराब वातावरणामुळे सिग्नल मिळण्यास अडचण झाली.

    नागपूर (Nagpur) : सर्वत्र पसरलेल्या धुक्यांचा फटका विमानसेवेलाही बसला. खराब वातावरणामुळे एअर इंडियाचे दिल्ली-नागपूर (एआय-४६९) हे विमान रायपूरकडे वळविण्यात आले. तब्बल दोन तासाच्या विलंबानंतर विमान नागपूरला उतरले.

    नाताळाच्या सुट्यांमुळे विमान वाहतूक वाढली आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानांची ये-जा वाढली आहे. दीड ते दोन हजार प्रवासी दररोज शहरात येत असून तितक्याच संख्येने प्रवासी नागपुरातून उड्डाण भरत आहेत. ही स्थिती हवाईसेवेसाठी चांगली मानली जात आहे. मंगळवारी सकाळपासून शहरात सर्वत्र धुके दाटून आले होते. संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्याचा परिणाम विमानांच्या आवागमनावर दिसून आला. दिल्ली-नागपूर हे विमान सकाळी ५.५५ वाजता उडाले. नियोजित वेळेनुसार सकाळी ७.४० वाजता विमान नागपूरला येणे अपेक्षित होते. परंतु, खराब वातावरणामुळे सिग्नल मिळण्यास अडचण झाली. परिणामत: विमान रायपूरला वळविण्यात आले. वातावरणाची स्थिती जाणून घेत विमान नागपूरच्या दिशेने निघालेले विमान सकाळी ९.४० वाजता पोहचले, अशी माहिती वरिष्ठ विमानतळ संचालक आबिद रुही यांनी दिली.

    अशी झाली सेवा प्रभावित
    इंडिगोचे पुणे-नागपूर, मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर, चेन्नई-नागपूर, गो फर्स्टचे मुंबई-नागपूर ही विमाने उशिराने आली. तर इंडिगोचे नागपूर-दिल्ली तसेच नागपूर-पुणे, नागपूर-मुंबई, नागपूर-चेन्नई, गो फर्स्टचे नागपूर-पुणे ही विमाने विलंबाने उडाली. याचा फटका प्रवाशांना बसला. गेल्या दोन वर्षांचा विचार करता वातावरणीय बदलांमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात विमानसेवा विस्कळीत होण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याचे सांगण्यात आले.