
मुंबई ( Mumbai ): राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचे विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी दीर्घकाळ चाललेल्या एसटी कामगारांच्या संपाला भाजप नेत्यांनी पाठिंबा दर्शवला होता. भाजप आमदार गोपीचंद पडळकर तसेच रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत तर तब्बल १६ दिवस आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांसोबत आझाद मैदानात बसून होते. पण एकदाही आझाद मैदानावरील आंदोलनात देवेंद्र फडणवीस गेले नाहीत, याबाबत बरेच तर्कवितर्क लावले जात होते. त्यावर आता खुद्द फडणवीसांनीच पडदा टाकला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी यावर टीव्ही ९ ला दिलेल्या विशेष मुलाखतीत भाष्य केले आहे. फडणवीस म्हणाले, तिथे आमचे दोन आमदार होते. एसटीचे लोक मला स्वत: येऊन भेटले. त्यांच्याशी चर्चा केली. मी सातत्याने त्यांचा प्रश्न मांडला. त्यामुळे तिथे गेलेच पाहिजे, असे काही नाही. त्यांच्यासोबत मी होतो. त्यांच्या प्रश्नावर तोडगा निघावा म्हणून सरकारशीही सातत्याने बोलत होतो.
फडणवीस पुढे म्हणाले, समंजसपणाची भूमिका आमच्या आमदारांनी दाखवली. जेव्हा संप मोडण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा आमच्या आमदारांनी संघर्ष केला. आमचे आमदार १६ दिवस आझाद मैदानात झोपले होते. कामगारांसोबत होते. त्यानंतर जेव्हा सरकार दोन पावले पुढे आले. तेव्हा आमच्या आमदारांनी सामंजस्याची भूमिका घेतली. सरकार पगार वाढ करत आहे. पण विलीनीकरणाचा प्रश्न सोडायचा नाही. पण दीर्घकाळ एसटीही बंद ठेवता येत नाही. कर्मचारी महत्त्वाचे आहेत. तसेच लोकही महत्त्वाचे आहेत. लोकांची गैरसोय होत आहे, याचा आमच्या लोकांनी विचार केला. पगारवाढीनंतर आमच्या लोकांनी माघार घेतली. पण विलीनीकरणाला आमचा पाठिंबा असल्याचेही माघार घेताना सांगितले. आम्ही सामंजस्याने भूमिका घेतल्यानंतर सत्तारुढ पक्ष त्यावर टीका करतो. आम्ही प्रगल्भता दाखवूनही सत्ता पक्ष अप्रगल्भ वागला नाही.
ST कर्मचारी संपात विलीनीकरणाचा मुद्दा भाजपने आणून सरकारला वेठीस धरल्याचा आरोप फडणवीसांनी फेटाळला. ते म्हणाले, संप सुरू झाल्यानंतर ८ दिवसानंतर भाजप नेते संपात सहभागी झाले. आम्ही या संपकाळात प्रगल्भपणे वागलो. पण या सरकारला प्रगल्भ विरोधी पक्षही नको असल्यामुळे कधी कधी वाटते विरोधाला विरोध केलेला बरा. आम्ही विलिनीकरणावर मार्गही सांगितला. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घ्या, म्हणून सांगितले होते.