मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 फूट उंचीच्या पुतळ्याचं अनावरण, देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती

मॉरिशिसच्या मोकात काल शिवरायांच्या नावाचा जल्लोष पाहायला मिळाला. येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं.

    जगभरातील अनेक देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue In Mauritius) उभारण्यात आला आहे. आता, मॉरिशसमध्ये अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस () यांची  उपस्थिती होती. यावेळी मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ, (Pravind Kumar Jugnauth) मॉरिशसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ॲलन गानू (Alan Ganoo)  मॉरिशसमधील भारताच्या उच्चायुक्त नंदिनी सिंगला (Nandini Singala) मॉरिशस मराठी मंडली फेडरेशनचे अध्यक्ष आसंत गोविंद हे प्रामुख्याने उपस्थित होते.  यावेळी जय शिवराय जयजयकाराने संपूर्ण परिसर दुमदुमुन गेला होता.

    भव्यदिव्य सोहळ्यात पुतळ्याचं अनावरण

    मॉरिशसमध्ये काल पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात मॉरिशसमधील मराठी भगिनी आणि बांधव उपस्थिती होते. यावेळी मराठी भाषिक बांधवांनी पारंपारिक पोषाखात या कार्यक्रमाला मोठ्या उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमादरम्यान अनेक सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा सादर करण्यात आले. यात गोंधळ, शेतकरी नृत्य, पोवाडा, इत्यादी मराठी प्रकारांचा समावेश होता.

    मॉरिशसमधील मराठी मंडली फेडरेशनला निधी

    मॉरिशसमधील मराठी मंडली फेडरेशनला मोठा निधी सरकारकडून मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र भवनाच्या विस्तारासाठी 44 दशलक्ष मॉरिशियस रुपये अर्थात भारतीय चलनाचे 8 कोटी रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला. या निर्णयाची घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मॉरिशसमधील 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल, असंही त्यांनी जाहीर केलंय. मॉरिशसमधील मराठी आणि महाराष्ट्रीयन बांधवांना राज्यासोबत सतत संपर्कात राहता यावे, यासाठी एक कक्ष स्थापन करण्यात येईल, असंही त्यांनी घोषित केले.

    १४ फुट उंचीचा हा पुतळा फायबर ग्लास मिडीयममध्ये तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मॉरिशियमधील हा सर्वात उंच पुतळा ठरला आहे. नाशिक येथील शिल्पकार विकास तांबट यांनी हा पुतळा तयार केला असून यासाठी तीन महिन्यांचा अवधी लागला आहे.