‘त्या’ पोलिसाची येरवडा कारागृहात रवानगी

दौंड येथील महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वसई येथील पोलीस कर्मचारी वाल्मिकी अहिरे याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

    यवत : दौंड येथील महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूस (Dipali Kadam Suicide Case) कारणीभूत ठरलेल्या वसई येथील पोलीस कर्मचारी वाल्मिकी अहिरे याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

    यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील देलवडी येथील मूळ रहिवाशी असलेली दीपाली कदम ही माणिकपूर वसई येथे महिला पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत होती. तिने ३ नोव्हेंबरला देलवडी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी तिने चिट्ठी लिहिली होती. त्याआधारे त्यांच्या भावाने दीपाली यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी वाल्मिकी अहिरे याच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मात्र, आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच तो गायब झाला होता.

    लग्नासाठी केला दीपाली यांचा छळ

    यवत पोलिसांनी अहिरेला अहमदनगर येथे जाऊन अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. आरोपी अहिरे दीपाली हिने त्यांच्यासोबत लग्न करावे म्हणून सतत मानसिक व शारीरिक त्रास देत होता. अहिरे हा विवाहित असून, त्याला दोन मोठी मुले आहेत. तरीही तो दीपालीशी लग्नासाठी दबाव टाकत होता. दीपाली यांचे लग्न ठरल्याचे कळताच तो जास्तच मानसिक, शारीरिक त्रास, मारहाण करू लागला होता. त्याच्या छळास कंटाळून दीपाली यांनी आत्महत्या केल्याची कबुली अहिरेने पोलिसांना दिली.

    पोलीस कोठडीची मुदत संपताच त्याला पुन्हा न्यायालयापुढे हजार करण्यात आले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानुसार अहिरे याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक केशव वाबळे,  पोलीस उपनिरीक्षक अश्विनी तावरे, नारायण जाधव, रमेश सुपेकर यांनी ही कारवाई केली.