दिव्यांगांनी सहाय्यभूत साधनांचा योग्य वापर करावा; बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी व दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने यांच्या मोफत वाटपासाठी आयोजित शिबिराचा ज्येष्ठांसह दिव्यांगांना आत्मनिर्भर बनण्यासाठी लाभ होईल.

    सातारा : साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी व दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने यांच्या मोफत वाटपासाठी आयोजित शिबिराचा ज्येष्ठांसह दिव्यांगांना आत्मनिर्भर बनण्यासाठी लाभ होईल. साधने मिळाल्यानंतर त्याचा योग्य वापर करावा, असे प्रतिपादन सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी केले.

    येथील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने यांच्या मोफत वाटपासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

    खासदार श्रीनिवास पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, सातारच्या नगराध्यक्षा माधवी  कदम, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे उपाध्यक्ष अनिल देसाई  आदी उपस्थित होते.

    दोन महिन्यानंतर साधनांचे वाटप

    पाटील म्हणाले, जगामध्ये शारीरिक दिव्यांगात्वावर संशोधन करुन अनेक साधने निर्माण केली आहेत. आजच्या शिबीरामध्ये  ज्येष्ठ तसेच दिव्यांगांना कोणत्या साधनांची गरज आहे याची तपासणी करुन दोन ते तीन महिन्यानंतर साधनांचे वाटप करण्यात येणार आहे. साधने मिळाल्यानंतर त्याचा योग्य वापर करावा. सध्या कोरोना संसर्ग कमी होत असला तरी ओमायक्रॉनचा नवीन व्हेंरीएंट  आला आहे. नागरिकांनी सामाजिक अंतर, वेळोवेळी हाताची स्वच्छता, मास्कचा वापर केला पाहिजे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.